जलसंपदा विभाग रिकामा; वरिष्ठ अभियंत्यांसह ९३१ जण एकाच दिवशी सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:35 AM2020-06-01T11:35:56+5:302020-06-01T11:36:01+5:30
८० अधीक्षक अभियंता, ३५७ कार्यकारी अभियंता, १,६८० उपविभागीय आणि ७,५०० कनिष्ठ अभियंता आहेत.
- राजरत्न सिरसाट
अकोला: राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठीचे प्रयत्न करणाऱ्या जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यासह ९३१ जण रविवारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले. यात वरिष्ठ अनुभवी अभियंत्यांचा समावेश आहे.
जलसंपदा (पाटबंधारे) विभागात राज्यात काम करणाऱ्यांमध्ये ८० अधीक्षक अभियंता, ३५७ कार्यकारी अभियंता, १,६८० उपविभागीय आणि ७,५०० कनिष्ठ अभियंता आहेत. नवीन भरती नगण्य आहे. असे असताना आजमितीस उपलब्ध असलेल्या या अभियंत्यांपैकी ८९० अभियंते हे सेवानिवृत्त झाले. इतर कर्मचारी मिळून हा आकडा ९३१ इतका आहे. सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये तीन अधीक्षक अभियंता, ६१ कार्यकारी अभियंता, २०७ उपअभियंता आणि ६२० कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. म्हणजेच आजमितीस या विभागात या अभियंत्यांच्या जागा रिक्त आहेत. लवकरच यातील आणखी काही वरिष्ठ अभियंते सेवानिवृत्त होणार आहेत. सद्यस्थितीत नवीन भरती नगण्य आहे. विदर्भात मोठे, मध्यम तसेच बॅरेजची कामे रखडली आहेत. या सर्व पृष्ठभूमीवर कनिष्ठ अभियंत्यांना मार्गदर्शन करायला अनुभवी वरिष्ठ लागतात. तसेच प्रकल्पाची कामे, नियोजन, डिझाइन अशी अनेक तांत्रिक कामे करावी लागतात. प्रकल्प बांधणे हेदेखील सर्वात महत्त्वाचे काम असल्याने यासाठी अनुभवी अभियंते लागतात, असे या विभागातील तज्ज्ञांचे मत आहे. गतवर्षी मोजक्या कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली. यावर्षी ‘कोविड-१९’मुळे नवीन भरती होईल की नाही, यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. नवीन भरतीमध्ये काही थेट कार्यकारी अभियंते मिळतील; पण त्यांनाही अनुभव घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे सेवानिवृत झालेल्या किंवा होणाºया अनुभवी अभियंत्यांना एक-दोन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. अगोदरच्या शासनाने हे केले आहे. विदर्भ सिंचन विकास मंडळावर कार्यकारी संचालक याच पद्धतीने घेण्यात आले. राज्यात इतर ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला.
पाटबंधारे विभागाचे राज्यातील ८९० वरिष्ठ अभियंत्यासह इतर कर्मचारी मिळून ९३१ जण रविवारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे अनुभवी अभियंत्यांची कमतरता निर्माण झाली आहे.
-मनोज बोंडे,
अध्यक्ष,
म. रा. राजपत्रित अभियंता संघटना,
अमरावती विभाग.