मानाच्या राजराजेश्वर पालखीचे गांधीग्राम येथून अकोल्याकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 01:11 AM2022-08-22T01:11:01+5:302022-08-22T01:30:50+5:30
हर्र बोला महादेव च्या गजरात शिवभक्त गांधीग्राम येथून रवाना झाले.
लाेकमत न्यूज नेटर्वक
अकाेला: लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोलेकरांचा लोकोत्सव...महाराष्ट्रातील एकमेव कावडयात्रा महोत्सव...यंदा दणक्यात साजरा करण्यात येणार आहे. श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी कावडसह पालखी यात्रा निघणार आहे. कावड यात्रेच्या स्वागतासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज झाली असून, सामाजिक, धार्मिक संस्था, संघटनासुद्धा कावड यात्रेतील शिवभक्तांच्या स्वागतासाठी उत्साहीत दिसून येत आहेत. दरम्यान, गांधीग्रामच्या पूर्णा नदीकाठी रविवारी रात्री १२ वाजता मानाच्या राजराजेश्वर कावड पालखीतील शिवभक्तांनी आरती केली़ त्यानंतर माेर्णेच्या पात्रातील जल भरण्यात भरून पालखीने अकाेल्यातील राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी प्रस्थान केले़
दोन वर्षे कोरोनामुळे शहरातच नव्हे तर जिल्ह्यात कावड यात्रेवर प्रतिबंध घालण्यात आला होता. केवळ राजेश्वराची पालखी काढून ग्रामदैवत राजराजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर शहरात कावड उत्सव होणार असल्याने, शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. शहरातील शेकडो शिवभक्त मंडळांचे कार्यकर्ते भरण्यांची कावड तयार करून गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर जल आणण्यासाठी रविवारी दुपारीच रवाना झाले होते.
सोमवारी पहाटेपासून या कावडी शहराकडे मार्गक्रमण करतील. कावड यात्रेमुळे शिवभक्त उत्साहित झाले असून, कावडीसह पालखीवर वेगवेगळे व आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. अकोल्यातील कावड यात्रा ही महाराष्ट्रातील एकमेव आणि ७७ वर्षांची परंपरा असलेली कावड यात्रा आहे. या कावड यात्रेच्या दृष्टिकोनातून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संस्था, संघटना स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. शहरातील प्रमुख चौक व कावड मार्गाला भगव्या पताकांसह स्वागत कमानींनी सजविण्यात आले आहे.
दुष्काळ, पाऊस अन् कावडची परंपरा
१९४४ साली अकोला जिल्ह्यात दुष्काळ पडला. सर्वत्र हाहाकार उडाला. श्रावण महिना होता तो. यादरम्यान पाऊस येण्यासाठी शिवाजी नगरातील काही शिवभक्तांनी मातीचे शिवलिंग घडविले आणि त्याची पूजाअर्चा सुरू केली आणि अकोल्यात धो-धो पाऊस बरसला. मोर्णेला पूर आला. अकोलेकरांसह शेतकरी आनंदित झाले. राजराजेश्वराने कौल दिला आणि त्या वर्षांपासून अकोल्यात कावडसह पालखी यात्रा महोत्सव सुरू झाला.
कावड यात्रेला ७७ वर्षांची परंपरा
शहराचे सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख असलेला कावड यात्रा महोत्सवाला ७७ वर्षांची परंंपरा आहे.
१९४४ सालापासून अकोल्यातील शिवभक्त मंडळे गांधीग्राम येथे भरण्यांची कावड तयार करून पूर्णा नदीचे जल आणतात आणि राजेश्वराला जलाभिषेक करतात.
-----------