सिंचन विहिरींच्या तपासणीचा बोजवारा

By admin | Published: June 14, 2016 02:11 AM2016-06-14T02:11:00+5:302016-06-14T02:11:00+5:30

अकोला जिल्हय़ातील १८४७ सिंचन विहिरींच्या पंचनाम्याचे अहवाल रखडले.

Depletion of inspection of irrigation wells | सिंचन विहिरींच्या तपासणीचा बोजवारा

सिंचन विहिरींच्या तपासणीचा बोजवारा

Next

संतोष येलकर /अकोला
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हय़ातील १ हजार ८४७ सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिला होता; मात्र एकाही तालुक्यातील सिंचन विहिरींच्या कामांचा पंचनाम्यासह तपासणी अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्हय़ात सिंचन विहिरी कामांच्या तपासणीचा बोजवारा उडाला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे केली जातात. मंजूर करण्यात आलेल्या विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या पृष्ठभूमीवर जिल्हय़ात गत मे अखेर करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांपैकी किती विहिरींची कामे बोगस आहेत, सिंचन विहिरी गायब करण्यात आल्या काय, विहिरींची कामे कागदोपत्री दाखवून अनुदानाची रक्कम काढण्यात आली काय,अनुदान आणि मजुरीची रक्कम वाटप करण्यात आली की नाही, याबाबत तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने गत मे २0१६ अखेरपर्यंत गत वर्षभराच्या कालावधीत जिल्हय़ात करण्यात आलेल्या १ हजार ८४७ सिंचन विहिरींच्या कामांचे पंचनामे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी इत्यादींच्या संयुक्त चमूूमार्फत करून तपासणीचा अहवाल ७ जूनपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चारही उपविभागीय अधिकार्‍यांना गत ३१ मे रोजी दिला होता; परंतु १३ जूनपर्यंत जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाश्रीटाकळी, बाळापूर,पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तालुक्यांपैकी एकाही तालुक्यातील सिंचन विहिरींच्या कामांबाबत पंचनाम्यासह तपासणीचा अहवाल एकाही उपविभागीय अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागाकडे प्राप्त झाला नाही. सिंचन विहिरींच्या कामांचे पंचनामे आणि तपासणीचे काम अद्याप प्रलंबित असल्याने, जिल्हय़ातील सिंचन विहिरींच्या कामांचे पंचनामे आणि तपासणीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सिंचन विहिरींच्या कामांची तपासणी केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Depletion of inspection of irrigation wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.