शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा
By admin | Published: July 8, 2016 02:09 AM2016-07-08T02:09:42+5:302016-07-08T02:09:42+5:30
सत्र सुरू होऊनही धान्याचा पुरवठा नाही; पोषण आहार शिजविणारे मानधनाविना.
अकोला : मध्यान्ह भोजन (मिड डे मिल) योजनेंतर्गत पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये अनुदानाचा अडथळा निर्माण होत असल्याने या योजनेचा बोजवारा उडला आहे. २७ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव थाटामाटात करणार्या प्रशासनाने पोषण आहार संबंधित शाळांना पोहोचविलाच नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाभरातील एकाही शाळेत पोषण आहाराचे वितरण झालेले नाही. त्यातच आता पोषण आहाराची माहिती दररोज ऑनलाइन अपडेट करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश शाळांवर पोहोचले आहेत. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांची कटकट आणखी वाढली असून, योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
सरकारी व शासनमान्य अनुदानित शाळांमध्ये दुपारी मुलांना पोषण आहार पुरविण्याची योजना आहे. पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी बचत गटांची असली, तरी योजनेचा आवश्यक तो लेखाजोखा ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. त्यामुळे पोषण आहार योजनेचे अनुदान वेळेवर मिळाले नाही, तर मुख्याध्यापकांना पोषण आहार शिजविणार्यांच्या मानधनापासून तर धान्य उपलब्ध करण्यासाठी उसनवारी करावी लागते. अकोल्या जिल्ह्यातील शाळांचे अनुदान हे गेल्या पाच महिन्यांपासून थकीत होते.
अनुदान उपलब्ध असतानाही केवळ अनुदानाचे देयके सादर करता आली नसल्याने हे पाच महिन्यांचे एकत्रित अनुदान या आठवडज़ात देण्यात आले आहे. यावरून प्रशासनातील गलथानपणा समोर आला आहे. जिल्हा परिषदेला अनुदान उपलब्ध असेल तर ते त्याच महिन्यात तत्काळ निर्गमित करता आले, तर योजना राबविताना मुख्याध्यापकांनाही हात उसन्याचा कारभार करावा लागणार नाही.