जिल्ह्यातील ११४ दुर्धर आजारग्रस्तांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करा!
By संतोष येलकर | Published: September 29, 2022 05:56 PM2022-09-29T17:56:05+5:302022-09-29T17:56:41+5:30
दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यातील ११४ दुर्धर रुग्णांच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदतीची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश
दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यातील ११४ दुर्धर रुग्णांच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदतीची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत गुरुवारी देण्यात आले.
दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या ११४ दुर्धर आजाराच्या रुग्णांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात आली काय, अशी विचारणा सभेत करण्यात आली. त्यानुसार दुर्धर आजारग्रस्तांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने सभेत देण्यात आली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएच एम) अंतर्गत आरोग्य सेविका पदभरतीच्या प्रश्नावर सभेत विचारणा करण्यात आली असता, यासंदर्भातील फाइल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली. कुष्ठ व क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य पुष्पा इंगळे, प्रगती दांदळे, प्रमोदींनी कोल्हे, गोपाल भटकर, किरण अवताडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विकासकामांच्या ५.७७ कोटींच्या आराखडयास मंजुरी!
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बोअरवेल, जलशुद्धीकरण यंत्र आदी सुविधांची उपलब्धता व प्रस्तावित विकासकामे करण्यासाठी ५ कोटी ७७ लाख रुपयांच्या कृती आराखडयास या सभेत मंजुरी देण्यात आली.