सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम तातडीने जमा करा !
By संतोष येलकर | Published: April 25, 2023 07:59 PM2023-04-25T19:59:55+5:302023-04-25T20:00:01+5:30
जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत निर्देश: निधी खर्चाचा घेतला लेखाजोखा.
अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे ‘पेन्शन’ अद्यापही का मिळाले नाही, अशी विचारणा करीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनिल फाटकर यांनी मंगळवार २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत दिले. विविध योजना आणि विकासकामांच्या निधी खर्चाचा लेखाजोखादेखिल या सभेत घेण्यात आला.
एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असताना, जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या ‘पेन्शन’ची रक्कम अद्याप का मिळाली नाही, अशी विचारणा करीत सेवानिवृत्त संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनिल फाटकर यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला सभेत दिले.
जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण, बांधकाम, लघु सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण, आरोग्य आदी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विकासकामांच्या निधी खर्चाचा आढावा देखिल या सभेत घेण्यात आला. जिल्हयातील पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपट्टी वसूलीच्या मुद्दयावर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनिल फाटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य विनोद देशमुख, वर्षा वझिरे, गायत्री कांबे, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दोन अधिकार गैरहजर;‘शो काॅज’ बजावणार !
जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेला महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन या दोन विभागाचे सहायक लेखाधिकारी सभेला गैरहजर होते. यासंदर्भात सदस्य वर्षा वझिरे व गायत्री कांबे यांनी विचारणा करीत प्रश्न उपस्थित केला. त्यानुषंगाने सभेला गैरहजर संबंधित दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा (शो काॅज) नोटीस बजावण्याचे निर्देश उपाध्यक्ष सुनिल फाटकर यांनी सभेत दिले.