कर्मचारी वेतनापासून वंचित; कनिष्ठ लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 09:54 AM2020-04-20T09:54:56+5:302020-04-20T09:55:03+5:30
कनिष्ठ लिपिक आर. आर. पटोकार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सद्यस्थितीत देशभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असताना त्यासाठी कार्यरत अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्याचे फेब्रुवारी महिन्याचे वेतनही थकीत राहण्याचा प्रकार बाळापूर तालुक्यातील हातरूण प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. याप्रकरणी हलगर्जी केल्याने उरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक आर. आर. पटोकार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी सादर केला. त्यावर उद्या सोमवारी आदेश होण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला. त्यामुळे अनेक विभागातील अधिकारी-कर्मचाºयांनी संबंधितांच्या कार्यालयातील वेतन देयक तयार करण्यास उशीर लावला. जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाकडे वेतन देयक आल्यानंतर तेथेही मंजुरीच्या प्रक्रियेतील संबंधितांची उपस्थिती कमी प्रमाणात असल्याने ती देयके तेथेही रखडली. अत्यावश्यक सेवेत असलेले आरोग्य विभागातील कर्मचाºयांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. बाळापूर तालुक्यातील हातरूणसह इतरही प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांचा समावेश आहे.
संबंधित लिपिक नसल्यामुळे वेतन रखडल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे घरखर्चासह इतरही बाबींचा खर्च कसा भागवावा, या समस्येत कर्मचारी आहेत. ही बाब ‘लोकमत’ने मांडली होती. त्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत तेथील कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
हातरूण केंद्रात कनिष्ठ लिपिक नसल्याने प्रभार उरळ येथील पटोकार यांच्याकडे देण्यात आला; मात्र त्यांनी प्रभार न घेणे, त्या पदाची कामे न केल्याने कर्मचाºयांच्या वेतनाला विलंब झाला. त्यामुळे याप्रकरणी पटोकार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यावर उद्या सोमवारी आदेश दिला जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, याबाबतची तक्रारही कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, महासचिव देवानंद डोंगरे यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदनातून केली होती.