शेतकऱ्यांना पीक विमा लाभापासून वंचित ठेवले; ICICI लोम्बार्ड कंपनीला काळया यादीत टाकणार
By संतोष येलकर | Published: May 15, 2023 04:43 PM2023-05-15T16:43:17+5:302023-05-15T16:44:08+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची माहती, जिल्हा प्रशासनाने केली शासनाकडे शिफारस
अकोला: जिल्ह्यात पीक विमा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड या विमा कंपनीने कामात दिरंगाई करुन, जिल्हयातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विमा लाभापासून वंचित ठेवले. त्यामुळे या प्रकरणी आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवार, १५ मे रोजी दिली.
पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसान भरपाइपोटी पीक विमा भरपाईचा मोबदला देण्यासाठी करावयाची प्राथमिक चौकशी, झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांचे पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी शासनामार्फत आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, जिल्हयात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना प्रतिसाद न देणे, त्यानुषंगाने कामात दिरंगाई करणे, मनुष्यबळाची उपलब्धता नसणे, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणे अशा कारणांमुळे आयसीआयसीआय लोम्बार्ड या विमा कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी शिफारस जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी १५ मे रोजी दिली.
शेतकऱ्यांचे प्रलंबित वीमा दावे ५ जूनपर्यंत स्वीकारणार !
जिल्हयात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचे विमा दावे अद्याप प्रलंबित असल्यास संबंधित दावे ५ जूनपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांनी पीक विमा दावे येत्या ५ जून पर्यंत सादर करावे,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.