वंचितच्या पदाधिकाऱ्यांची भाजप नेत्यांसाेबत झाली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:55+5:302021-06-16T04:25:55+5:30
अकाेला : जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्येच धुसफूस वाढतच आहे त्याचीच परिणती म्हणून साेमवारी वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी ...
अकाेला : जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्येच धुसफूस वाढतच आहे त्याचीच परिणती म्हणून साेमवारी वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या जिल्हास्तरीय नेत्यांसाेबतच चर्चा केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने वंचितच्या आठ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे संख्या बळ कमी झालेल्या वंचितला सभागृहात भारतीय जनता पक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करत असल्याचे अनेक सभांमध्ये समाेर आले आहे. वंचितला जिल्हा परिषदेत सर्वात प्रबळ विराेध हा शिवसेनेचा असून सध्या भाजप व शिवसेनेत प्रचंड मतभेद असल्याने सेनेला चेकमेट करण्यासाठी भाजपाने वंचितला स्पाॅट काॅर्नर केल्याचे दिसून येते. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षांतर्गत नाराजीचा सूर आहे. सध्याच पदांमध्ये बदल केला तर संख्येचे गणित कसे जुळविता येईल याची चाचपणी गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी साेमवारी भाजपच्या नेत्यांसाेबत भेट घेऊन केलेल्या चर्चेमुळे जिल्हा परिषदेत फेरबदलाचे वारे वाहणार असल्याचे संकेत आहेत. या बैठकीत काय चर्चा झाली याचा तपशील जरी समाेर आला नसला तरी वंचितच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत दुजाेरा दिला आहे. त्यामुळे २३ जूनच्या सर्वसाधारण सभेत नेमके काेणते मुद्दे समाेर येतात आणि काेण समर्थन किंवा विराेध करताे यावरून पुढील राजकारणाचे संकेत मिळण्याची चिन्हे आहेत.