खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील शिक्षक नोंदणीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 03:54 PM2019-11-13T15:54:24+5:302019-11-13T15:54:31+5:30
अनेक मुख्याध्यापकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पत्र न दिल्यामुळे या शिक्षकांना मतदार नोंदणीपासून वंचित राहावे लागले.
अकोला: राज्यात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक मतदारांची नोंदणीची मुदत ६ नोव्हेंबरपर्यंत होती. खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील हजारो शिक्षकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शाळेत तीन वर्ष शिकविल्याचे मुख्याध्यापकांचे पत्र जोडावे लागते; परंतु अनेक मुख्याध्यापकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पत्र न दिल्यामुळे या शिक्षकांना मतदार नोंदणीपासून वंचित राहावे लागले.
औरंगाबाद विभाग, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम ६ नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आला. २३ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केल्यानंतर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीसाठी एक महिन्याची मुदत दिली होती; परंतु या कालावधीत विधानसभा निवडणूक आणि दिवाळी सुट्ट्यांमुळे शिक्षकांना मतदार नोंदणी करता आली नाही. यासोबतच खासगी शाळा, कॉन्व्हेंटमधील हजारो शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी शाळेत तीन वर्ष शिकविण्याचे कार्य केल्याचे मुख्याध्यापकांचे पत्र जोडण्याची अट आहे; परंतु मुख्याध्यापक स्वत:च्या जबाबदारीवर शिक्षकांना पत्र द्यायला तयार नसल्यामुळे हजारो शिक्षकांना मतदार नोंदणी वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात २0१३ च्या तुलनेत यंदा शिक्षक मतदारांची नोंदणी कमी झाली आहे. याचा परिणाम निवडणुकीवर होणार आहे. (प्रतिनिधी)