उपमुख्यमंत्री फडणवीस अकोल्यात दाखल; पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 12:26 PM2023-10-07T12:26:40+5:302023-10-07T12:27:36+5:30
शहीद स्मारकाचे उद्घाटन, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम
राजरत्न शिरसाट
अकोला - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाआरोग्य शिबिरासाठी अकोल्यात आगमन झाले असून नांदेड येथील आरोग्य बळींच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्तात त्यांचे कार्यक्रम होत आहेत. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सात व आठ ऑक्टोबर असे दोन दिवसीय महाआरोग्य शिबिर आयोजनात आले असून या शिबिरात सुमारे 25 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे या शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस व अलीकडेच नियुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोल्यात आगमन झाले.
नांदेड येथील डा. शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या चार दिवसात 55 रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून विरोधकांनी राज्य शासनावर टीकेची झोड उठविली आहे. या पाठोपाठ नागपूर येथेही असेच बळी पडल्याचे समोर आले. त्यामुळे फडणवीस यांच्या अकोला दौऱ्यात सुरक्षेची कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
अकोला विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यावर पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले, त्यानंतर शहीद स्मारकाच्या विस्तारित कामाचे लोकार्पण झाले. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला ही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी आदी मान्यवरही आहेत. या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला. शासकीय अधिकाऱ्यांच्या खिशातील पेन देखील सुरक्षा यंत्रणेकडून प्रवेशद्वारावरच काढून घेण्यात आलेत. मुख्य महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम शासकीय रुग्णालय आवारात होत असून तेथे पोलिसांकडून पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. आंदोलने अगर निदर्शने करू शकणाऱ्या नेत्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा काल रात्रीपासून 'वॉच' आहे.
दरम्यान, नांदेड व नागपूर येथील आरोग्य बळींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आंदोलन होण्याच्या शक्यता लक्षात घेता शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच शहर प्रमुख राजेश मिश्रा यांना श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शन करतेवेळी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार नितीन देशमुख तातडीने राजेश्वर मंदिरात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांसोबत वादावादी झाल्याचेही समजते.