चार महिन्यांपासून उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांची मनपाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 01:36 PM2020-03-28T13:36:52+5:302020-03-28T13:37:36+5:30
रजेचा अर्ज सादर न करता ते आजपर्यंतही सेवेत रुजू झाले नसल्याची माहिती आहे.
अकोला: महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांची प्रदीर्घ रजा नोव्हेंबर २०१९ मध्ये संपुष्टात आल्यानंतरही ते आजपर्यंत महापालिकेत रुजू झाले नाहीत. कोरोना विषाणूच्या धर्तीवर सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या असताना उपायुक्त म्हसाळ आहेत कोठे, असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या निर्देशानुसार उपायुक्त वैभव आवारे यांनी २६ मार्च रोजी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना अवगत केले आहे.
महापालिकेच्या उपायुक्तपदी १४ मार्च २०१९ रोजी नियुक्त झालेले विजयकुमार म्हसाळ यांनी उण्यापुऱ्या सहा महिन्यांतच महापालिकेकडे पाठ फिरविल्याची बाब उजेडात आली आहे. त्यांनी ३० आक्टोबरपासून एक महिन्याच्या प्रदीर्घ रजेसाठी अर्ज केला होता. त्यांचा रजेचा कालावधी २३ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला. ही रजा संपुष्टात आल्यानंतर त्यांनी मनपात तातडीने रुजू होणे अपेक्षित होते. तसे न करता किंवा मनपाकडे पुन्हा रजेचा अर्ज सादर न करता ते आजपर्यंतही सेवेत रुजू झाले नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, नगरसेवक सरसावले असताना उपायुक्त विजय कुमार म्हसाळ नेमके आहेत कोठे, असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकाराबद्दल आयुक्त कापडणीस यांच्या निर्देशानुसार उपायुक्त वैभव आवारे यांनी २६ मार्च रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी पत्रव्यवहार करीत रिक्त असलेल्या उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने सक्षम अधिकाºयाची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे, अथवा विजय म्हसाळ यांना रुजू होण्याबाबत आदेश देण्याची विनंती केली आहे.
...तर कठोर कारवाई
मनपात वरिष्ठ पदांवर रुजू होणारे अधिकारी जाणीवपूर्वक दीर्घ रजा घेतात. त्यामुळे मनपाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित होते. ही बाब लक्षात घेता अशा अधिकाऱ्यांवर विधिमंडळाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याचे संकेत आमदार रणधीर सावरकर यांनी दिले आहेत.