पाणी पिण्यासाठी उतरले, धावती ट्रेन पकडताना बाप-लेक खाली पडले
By Atul.jaiswal | Published: May 17, 2023 11:31 AM2023-05-17T11:31:57+5:302023-05-17T11:34:47+5:30
पोलिस दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने वाचल्याची घटना मंगळवारी (दि. १६) दुपारच्या सुमारास घडली.
अकोला : रेल्वेस्थानकावर पाणी पिण्यासाठी उतरल्यानंतर सुरू झालेली गाडी पकडण्याच्या प्रयत्नात हात घसरून खाली पडलेल्या ओडिशा राज्यातील कटक येथील पिता-पुत्राचे प्राण रेल्वे पोलिस दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने वाचल्याची घटना मंगळवारी (दि. १६) दुपारच्या सुमारास घडली.
अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्र. १ वर दुपारी १२.२६ वाजता १२८८० भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस आली असता, या गाडीत कटक ते मनमाड असा प्रवास करत असलेल्या साहू कुटुंबीयांपैकी वडील सौरभ साहू व मुलगा शरदचंद्र साहू पाणी पिण्यासाठी फलाटावर उतरले. पाण्याच्या बाटल्या भरेपर्यंत १२.३० वाजता गाडी फलाटावरून पुढे रवाना झाली. गाडी सुटल्याचे पाहून सौरभ साहू व मुलगा शरदचंद्र साहू दोघे पळत त्यांच्या डब्यापर्यंत पोहोचले व चढण्याचा प्रयत्न करू लागले. हात ओले असल्यामुळे वडील व मुलगा धावत्या गाडीतून फलाटावर पडले. यावेळी फलाटावर कर्तव्यावर असलेले आरपीएफ पोलिस निरीक्षक युनूस खान, उपनिरीक्षक एस. एम. शाहू व सहायक उपनिरीक्षक पाटील यांनी हा प्रकार पाहिला. उपनिरीक्षक एस. एम शाह यांनी धाव घेत शरदचंद्र साहू याला पडण्यापासून वाचविले. तोपर्यंत वडील सौरभ साहू रेल्वे रुळ व फलाटामधील जागेत पडले. त्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. परंतु, तेथे असलेले निरीक्षक युनूस खान यांनी सौरभ साहू यांना धीर देत फलाटाच्या भिंतीला चिकटून राहण्यास सांगितले.
साहू यांनीही त्यांचे म्हणणे ऐकले. तोपर्यंत चालकाला संदेश गेल्यामुळे गाडी थांबविण्यात आली. युनूस खान यांनी तातडीने धाव घेत सौरभ साहू यांना बाहेर काढले. गाडीत बसलेल्या साहू कुटुंबीयांना ही बाब समजताच मुलगी व पत्नीने टाहो फोडला. परंतु दोघेही सुरक्षित असल्याचे समजल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. साहू कुटुंबीयांनी आरपीएफ पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले. दोघेही पिता-पुत्र सुरक्षित असल्यामुळे त्यांना कुटुंबीयांसह त्याच गाडीने मनमाडकडे रवाना करण्यात आले. आरपीएफ अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.