अकोला जिल्ह्यात हिवतापाचा उतरता आलेख; चार वर्षांत रुग्ण संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:24 PM2018-04-25T13:24:56+5:302018-04-25T13:24:56+5:30
जिल्ह्यात गत चार वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याची नोंद हिवताप विभागाकडे आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला: मनुष्याची प्राणहानी करणाऱ्या आजारांमध्ये हिवतापाचा (मलेरिया) क्रमांक बºयाच वरचा असून, दरवर्षी जगात या आजाराने अनेकांचा मृत्यू होतो. आरोग्याच्या दृष्टीने हिवताप ही एक महत्त्वाची समस्या असून, या रोगाच्या उच्चाटनासाठी २०३० पर्यंत हिवतापमुक्तीचे धोरण ठरविण्यात आले असून, यामध्ये अकोला जिल्ह्याने आघाडी घेतल्याचे गत चार वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गत चार वर्षांत हिवताच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याची नोंद हिवताप विभागाकडे आहे.
हिवतापाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचे घोषवाक्य ‘तयारी हिवतापास हरविण्याची’, हे आहे. ‘अॅनाफिलिस’ या डासांच्या मादीपासून हिवतापाचा प्रसार होतो. मलेरियाचे चार प्रकार आहेत. यामध्ये प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम, प्लास्मोडियम मलेरिया व प्लास्मोडियम ओव्हेल यांचा समावेश आहे.
यापैकी प्लास्मोडियम फॅल्सिपॅरम या आजारात वेळीच उपचार घेतला नाही, तर मृत्यू होण्याची शक्यता असते. भारतात प्लास्मोडियम व्हायवॅक्स, प्लास्मोडियम फॅल्सिपेरम या प्रकारचे जंतू आढळतात. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत हिवतापाबाबत जनजागृती करण्यात येऊन रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतो. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे रक्त नमुने घेतले जातात. हिवताप निष्पन्न झालेल्या रुग्णांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देऊन उपचार केले जातात. तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजले जातात. वर्ष २०१४ मध्ये हिवतापाचे १९६ रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर २०१५ मध्ये १७९, २०१६ मध्ये ९२ रुग्ण, तर २०१७ मध्ये केवळ ५३ रुग्णांना हिवतापाची बाधा झाल्याची नोंद आहे. यावर्षी मार्च अखेरपर्यंत हिवतापाचे केवळ आठ रुग्ण समोर आले आहेत. रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्हा लवकरच हिवतापमुक्त घोषित होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे आशादायी चित्र आहे.
पाचही जिल्ह्यांत आशादायी चित्र
आरोग्यसेवा (हिवताप) अकोला मंडळातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये हिवतापावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. २०१७ मध्ये पाचही जिल्ह्यांमधून २० लाख ५५ हजार ४६ रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी २८५ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळले. यावर्षी रुग्णांची संख्या लक्षणीय घटून ती केवळ ३६ वर आली.
गत चार वर्षांत हिवताप निर्मूलनात बºयाच अंशी यश आले आहे. स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविता येते. हिवतापाला आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, डासांच्या चाव्यापासून बचावासाठी मच्छरदाणीचा वापर करावा.
- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्यसेवा, (हि.) अकोला.