हताश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने उभ्या पिकात फिरविला रोटावेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:58 PM2020-10-11T12:58:18+5:302020-10-11T12:58:53+5:30
Akola, Agriculture, Telhara Farmer लागवडीचा खर्चही वसुल होण्याची शक्यता नसल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात चक्क रोटावेटर फिरविले आहे.
- सत्यशील सावरकर
तेल्हारा : तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी सुद्धा पिकांवर आलेल्या विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव व अनियमित पाऊस हवामानाचा जबरदस्त फटका बसला मुंग,उळीद पिकाचे नुकसान झाले त्यानंतर काढणीस तयार सोयाबीन पिकांवर आलेल्या किड, रोगांमुळे फलधारणा न झाल्याने लागवडीचा खर्चही वसुल होण्याची शक्यता नसल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात चक्क रोटावेटर फिरविले आहे.
तालुक्यातील गाडेगाव येथील शेतकरी समाधान गोविंदा साबळे व गजानन समाधान साबळे यांनी आपल्या ७ एकर शेतात सोयाबीन पिकाचे पेरणी केली होती पिकाचे मशागत, निंदणी,डवरणी, खतांची मात्रा योग्य रितीने पाहीजे त्या प्रमाणात योग्य वेळी केली, पिकांवर आलेल्या किड व रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणी केली एवढे सर्व करून सुद्धा सोयाबीन पिकाला पाहीजे त्या प्रमाणात फलधारणा दिसत नव्हती.पिक पेरणी ते काढणी पर्यंत चा खर्च पाहता पिकांचे उत्पादन दिसत नसल्याने हताश शेतकऱ्यांनी पुढील पिकांचे नियोजन पाहता सोयाबीन काढणी करून काहीच मिळणार नाही उलट आहे तो पैसा काढणीत जाईल हाती उत्पादन मात्र नगण्य हि परिस्थिती पाहता अखेर शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर जड अंत:करणाने रोटावेटर मारले आहे.
यावर्षी सुरुवातीच्या काळात पिक जोमदार होते. मध्यंतरी निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनच्या पिकावर खोडकिडा व यल्लो मोझॅकचा मोठा प्रादुर्भाव झाला किटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी करूणही उपयोग झाला नाही परिणामी काही शेतात सोयाबिन च्या पिकाला फळधारणा झाली नाही काही शेतात फळधारणा झाली मात्र शेंगामधील दाणे परिपक्व होण्यापूर्वीच पीक पिवळे पडून उत्पादन नगण्य झाले आहे त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे .
आम्ही सोयाबीन पिक विम्याचा हप्ता भरला आहे. पिकाला अनियमित पाऊस हवामानाचा व खोडकिड व पिवळ्या मोझॅकमुळे फटका बसल्याने सात एकरातील सोयाबिन पिकाचे उत्पादन झाले नाही व पिक पुर्णपणे नष्ट झाले त्यामुळे विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी.
- समाधान गोविंद साबळे / गजानन समाधान साबळे
शेतकरी गाडेगाव.