Remedicivir: ऑर्डर दिली नसतानाही अकोल्यातील मेडिकल संचालकाला मिळाली ९० रेमडेसिविरची पार्सल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:01 AM2021-04-25T11:01:32+5:302021-04-25T11:04:05+5:30
Received a parcel of Remedicivir in Akola : या ९० इंजेक्शनचा मालक कोणीही समोर आला नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. असे असतानाच शनिवारी आदर्श कॉलनीतील बालाजी मेडिकलवर ९० रेमडेसिविर इंजेक्शनचे पार्सल देण्यात आले. त्यांनी हे बोलावलेच नसल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली ; तर हे इंजेक्शन बालाजी मेडिकल दुर्गा चौकातील असल्याचे समोर आले; मात्र दुर्गा चौक बालाजी मेडिकलच्या संचालकांनी हा औषध साठा नाकारल्याने अकोल्यात आलेल्या ९० इंजेक्शनचे गौडबंगाल कायम आहे. हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.
राज्यभर रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा असताना आदर्श कॉलनी येथील बालाजी मेडिकलमध्ये शनिवारी दुपारी ९० रेमडेसिविर इंजेक्शनचे पार्सल पोहोचले. त्यांनी ऑर्डरच दिलेली नसताना हे पार्सल त्यांना मिळाल्याने त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी देयकावरून तपासणी केली असता हे पार्सल दुर्गा चौकातील डॉक्टर बोचरे यांच्या बालाजी मेडिकलचे असल्याचे समोर आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देयकावरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून बोचरे यांना बोलावून घेतले. मात्र त्यांनीही अशा प्रकारचे कोणतेही पार्सल बोलावले नसल्याची माहिती दिली. त्यामुळे ९० इंजेक्शनचे गौडबंगाल काय याचा उलगडा झाला नाही ; मात्र हे इंजेक्शन अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्याचा वाली सध्या तरी सापडला नसल्याचे वास्तव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेमडेसिविरची निर्यात करणाऱ्या हैदराबाद येथील रेट्रो कंपनीशी संपर्क साधला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात अकोल्याच्या एरिया मॅनेजरशी संपर्क करून दिला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एरिया मॅनेजर यांच्याशी ९० इंजेक्शन संदर्भात चौकशी केली असता, त्यांनाही पूर्ण माहिती नसल्याचे सांगितले. मात्र या प्रकरणाचा तपास करून इंजेक्शनची दोन लाख रुपयांची रक्कम संबंधित कंपनीच्या खात्यात पाठविणाऱ्या व्यक्ती, संस्थेचा बँकेचा संपूर्ण गोषवारा देणार असल्याचे आश्वासन दिले.
ही रक्कम नेमकी कोणी पाठवली, याचा शोध शनिवारी रात्री उशिरापर्यंत लागला नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता रेट्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन लाख रुपयांची रक्कम पाठविणाऱ्या संबंधित व्यक्तीची संपूर्ण डिटेल्स मागविले आहेत. हे डिटेल्स आल्यानंतर ९० इंजेक्शन कोणी बोलावले व कोणासाठी बोलावले त्याची विक्री काळ्याबाजारात होणार होती का या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे. दरम्यान सध्यातरी या ९० इंजेक्शनचा मालक कोणीही समोर आला नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
कारवाईमुळे इंजेक्शनचा मालक सापडेना
रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने पाच आरोपींना बेड्या ठोकताच दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी ९० इंजेक्शन अकोल्यात पडून आहे. एका इंजेक्शनसाठी मोठी मारामार होत असताना ९० इंजेक्शनचा मालक समोर येत नसल्याने हा साठा संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईची दहशत आता काळ्याबाजारात पसरली असून या कारवाईमुळे इंजेक्शनचा मालक सध्यातरी भूमिगत झाला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे ; मात्र सोमवारपर्यंत खरा मालक समोर येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नाम साधर्म्यामुळे झाली गफलत
रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा दुर्गा चौक येथील डॉक्टर बोचरे यांच्या बालाजी मेडिकलचे असल्याचे देयकावर नमूद आहे. मात्र कुरिअर कंपनीने हे ९० इंजेक्शन आदर्श कॉलनी येथील बालाजी मेडिकलमध्ये दिले ; मात्र दोघांनीही हे इंजेक्शन बोलावले नसल्याने अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना माहिती दिली. दोन्ही ठिकाणी बालाजी मेडिकलचे नाव असल्याने ही गफलत झाल्याचे माहिती आहे. मात्र आता हा साठा नेमका कोणी बोलावला हे तपासा नंतरच उघड होणार आहे.