‘शॉक थेरपी’ असूनही रुग्ण रेफर टू नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:27 PM2019-07-12T12:27:11+5:302019-07-12T12:27:17+5:30
अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात ‘शॉक थेरपी’ची सुविधा असूनही बहुतांश रुग्ण नागपूर येथे पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
अकोला : सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात ‘शॉक थेरपी’ची सुविधा असूनही बहुतांश रुग्ण नागपूर येथे पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागात असलेली शॉक थेरपीसाठी ईसीटी मशीन मागील काही दिवसांपासून धूळ खात पडली आहे. रुग्णांवर उपचारासाठी येथे एमडी डॉक्टर आणि अॅनेस्थिसिया तज्ज्ञही उपलब्ध आहेत. या सर्व आवश्यक सुविधा असूनही येथे मनोविकृती रुग्णांना थेट नागपूरला पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
एकाही रुग्णावर उपचार नाही!
मनोविकृती विभागात ईसीटी मशीन दाखल झाल्यापासून एकाही रुग्णावर या मशीनचा उपयोग करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही मशीन आणली तेव्हापासून धूळ खात पडलेली आहे, तर रुग्णांना याच उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात येते.
रुग्णसेवक संघटनेचे निवेदन
सर्व सुविधा उपलब्ध असूनही येथील मनोविकार रुग्णांना शॉक थेरपीसाठी नागपूर येथे जावे लागत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचाव्यात, तसेच संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे महानगराध्यक्ष आशिष सावळे यांनी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांना दिले.