शस्रांची अवैधरीत्या निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:47+5:302021-03-06T04:17:47+5:30
दहशतवादविरोधी कक्षाची कारवाई; दोन पिस्तूलसह धारदार शस्राचा साठा जप्त अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलाल चाळ परिसरात ...
दहशतवादविरोधी कक्षाची कारवाई; दोन पिस्तूलसह धारदार शस्राचा साठा जप्त
अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलाल चाळ परिसरात अवैधरीत्या शस्र बनविण्यात येत असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाने गुरुवारी रात्री छापा टाकला. या ठिकाणावरील शस्रांंची अवैधरीत्या निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त करीत पोलिसांनी दोन पिस्तूलसह धारदार शस्राचा साठा जप्त केला आहे.
कलाल चाळ येथील रहिवासी अन्वर खान इब्राहीम खान हा धारदार शस्राची अवैधरीत्या निर्मिती करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पथकासह पाळत ठेवून शस्र बनवीत असताना या कारखान्यावर धाड टाकली. त्यानंतर या ठिकाणावरून दोन पिस्तूल जप्त केल्या. यासोबतच दोन तलवारी, तीन कुकरी, एक गुप्ती, तलवारीच्या चार मूठ, लोखंडी पाते, लोखंडी स्टीलचा रॉड, स्टीलचे पाते, ग्राइंडर मशीन, हातोडी, कानस यासह तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणावरून अनेकांना शस्र विक्री झाल्याची माहिती आहे. अनेक गुन्ह्यात या शस्रांंचा वापर झाल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी दिली. याप्रकरणी अन्वर खान इब्राहीम खान यांच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याचे कलम ४/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपनिरीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.