डुकरांकडून शेतीची नासधूस; वन विभागाने केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:15 AM2021-01-09T04:15:35+5:302021-01-09T04:15:35+5:30
पणज: परिसरातील नरसिंगपूर शेत शिवारात पिसाळलेल्या जंगली डुकराने शेतकरी, मजुरावर गुरुवारी सकाळी हल्ला केल्यानंतर ...
पणज: परिसरातील नरसिंगपूर शेत शिवारात पिसाळलेल्या जंगली डुकराने शेतकरी, मजुरावर गुरुवारी सकाळी हल्ला केल्यानंतर शुक्रवारी दुपारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाेहाेचून पंचनामा केला. पणज परिसरात जंगली डुकराने शेतकऱ्यांवर हल्ला केलेल्या भागाची वन विभागाने केली पाहणी करून जखमींची भेटही घेतली. दरम्यान, परिसरातील शेतीची डुकरांनी केलेल्या नासधुशीचे वास्तव चित्र समाेर आले. वन्य प्राण्यांचा तत्काळ बंदाेबस्त करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी यावेळी रेटून धरली.
परिसरात वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या हैदाेसामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, पिकांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात रात्री पहारा द्यावा लागत आहे. दरम्यान, ७ जानेवारीला सकाळी शेतकऱ्यांवर पिसाळलेल्या जंगली डुकराने हल्ला केला होता. पणज येथील शेतकरी संजय आवंडकार व शेतमजूर अशोक काळबाग हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले हाेते. दरम्यान, अचानक पिसाळलेल्या जंगली डुकराने हल्ला केला व यात दोघेही गंभीर जखमी झाले हाेते. उपचारानंतर दाेघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
वन विभाग, अकाेलाचे सहायक वनसंरक्षक सुरेश वडोदे, अकाेल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ओवे यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली. चौकशीसाठी अकाेटचे वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी ए. एन. वावणे, अकोटचे वनरक्षक सहायक एस. जी. जोंधळे, कर्मचारी सोमंत रजाने यांनी परिसरात झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगली डुकराने केलेल्या हल्ला परीसराची व घटनास्थळाची पाहणी व चौकशी केली. पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण करू, असा दिलासा वन विभागाने शेतकऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांनी जखमी झालेले शेतकरी संजय आवंडकार व शेतमजूर अशोक काळबाग यांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी बळीराम आवंडकार आशिकभाई, मनोहर आवंडकार, पत्रकार संजय गवळी, अमाेल आकाेटकार यांच्यासह शेतकरी, वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.