युपीएससी उत्तीर्ण देवानंद ठरला मृत्युंजय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:26 AM2021-09-10T04:26:05+5:302021-09-10T04:26:05+5:30
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण आणि दोनदा मुलाखतीसाठी पात्र झालेल्या तेल्हारा येथील आयआयटीयन देवानंद सुरेश तेलगोटे याने मुलाखतीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. ...
युपीएससी परीक्षा उत्तीर्ण आणि दोनदा मुलाखतीसाठी पात्र झालेल्या तेल्हारा येथील आयआयटीयन देवानंद सुरेश तेलगोटे याने मुलाखतीच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. दिल्लीत तो कोरोना बाधित झाला. कोरोना बाधित झाल्याचे कळताच देवानंद अकोल्यात परत आला आणि २८ एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये भरती झाला. परंतु त्याची प्रकृती खालावत गेली आणि डॉक्टरांनी त्याला ईसीएमओ थेअरपीची आवश्यकता आहे असे सांगितले. पुढील होणारा खर्च हा प्रचंड असल्याने संपूर्ण मित्रपरिवाराची यंत्रणा उभी राहिली आणि १५ मे रोजी देवानंदला एअर ॲम्ब्युलन्सने हैदराबादच्या केआयएमएस हॉस्पिटल येथे हलविले. हैदराबाद येथे नेण्यासाठी रचकोंडा हैदराबाद पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी अथक परिश्रम घेतले. दरम्यान ९ जूनला देवानंदला हृदयविकाराचा झटका आला. तो दिवस कुटुंबीय, मित्रांसाठी प्रचंड संघर्षाचा होता. पुढे देवानंदच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली.
त्याच्या उपचारासाठी अकोला येथील प्रसिद्ध फुप्फुस तज्ज्ञ डॉ. सतीश गुप्ता, हैदराबाद येथील डॉ. संदीप अत्तवार,डॉ. भास्कर राव, डॉ. विजील राहुलन यांनी प्रचंड मेहनत घेतली. अद्यापही देवानंदला प्राणवायुचा आधार आहे. असे त्याचा भाऊ किरण तेलगोटे, सुमित कोठे यांनी सांगितले.
फोटो:
देव तारी त्याला कोण मारी
देवानंद तेलगोटे याचे प्राण वाचविण्यासाठी मित्रमंडळी व कुटुंबीयांनी १ ते दीड कोटी रूपये गोळा केले. सर्वांनी त्याच्यासाठी पुढे येऊन मदतीचा हात दिला. डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न केले. परंतु देवानंदच्या इच्छाशक्तीपुढे मृत्यूही मागे सरला. अखेर त्याने मृत्यूवर विजय प्राप्त केला. देवानंदची प्रकृती लवकर बरी होऊन तो लवकर स्वगृही परतावा, अशी प्रार्थना अनेकांनी केली.