जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली विकसित, महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा स्तरावर प्रणाली कार्यान्वित
By आशीष गावंडे | Published: January 18, 2023 07:01 PM2023-01-18T19:01:01+5:302023-01-18T19:01:01+5:30
शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते विनाविलंब अदा करण्यासाठी जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम ही प्रणाली अकोला जिल्हा कोषागारमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते विनाविलंब अदा करण्यासाठी जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम ही प्रणाली अकोला जिल्हा कोषागारमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच शासकीय योजनांच्या निधी वितरणाची कार्यवाही जलद गतीने करण्यासाठी राज्यात सर्वप्रथम जिल्हास्तरावर अकोला जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात रकमांचे तात्काळ थेट प्रदान करणे सोयीस्कर झाले आहे. धनादेश वटविण्याची प्रक्रिया तातडीने केली जाईल. देयके अदा करण्यातील विविध टप्पे कमी होतील. तसेच शासनाकडून प्राप्त विविध योजनांचा निधी संबंधित विभागाच्या बँक खात्यात दीर्घकाळ अखर्चित पडून राहणार नाही. शासन निधीच्या जमा व खर्चाची प्रक्रिया सुलभ होणार असल्यामुळे शासनाकडून नवीन निधी मिळण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणार आहे.
राज्य शासनाचा 'आरबीआय' सोबत करार
जिल्हा कोषागार मध्ये ई-कुबेर प्रणाली राबविण्यासाठी राज्य शासनाने भारतीय रिझर्व बँक सोबत करार केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबविण्यासाठी शासनाचा वित्त विभाग लेखा व कोषागरे संचालनालय, राष्ट्रीय सूचना केंद्र पुणे यांनी अकोला जिल्हा कोषागारची निवड केली आहे. राज्यात जिल्हास्तरावर सर्वप्रथम अकोला जिल्हा कोषागारमध्ये १२ जानेवारी पासून या प्रणालीच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांची प्रदाने सुरू करण्यात आली आहेत.
अनेकदा शासनाकडून प्राप्त विकासकामांचा निधी संबंधित कार्यालयाच्या बँक खात्यात अखर्चित पडून राहतो. नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तातडीने अदा केली जातील. यामुळे शासकीय कार्यालयातील आर्थिक व्यवहार सुरळीत व जलद गतीने पार पडण्यास मदत होईल.
- मनजीत गोरेगावकर जिल्हा कोषागार अधिकारी, अकोला