विकास गेला खड्ड्यात; आधी मोकाट डुकरे, जनावरांचा बंदोबस्त करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 03:50 PM2019-10-16T15:50:59+5:302019-10-16T15:51:03+5:30
प्रभागांमध्ये उच्छाद मांडणाऱ्या मोकाट डुकरांच्या समस्येला अकोलेकर प्रचंड वैतागले आहेत.
अकोला: शहरातील दर्जाहीन व निकृष्ट सिमेंट रस्त्यांचे तुणतुणे वाजवणे बंद करा, विकास गेला खड्ड्यात. आधी मोकाट डुकरे व जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचा संतप्त सूर अकोलेकरांमधून उमटत आहे. प्रभागांमध्ये उच्छाद मांडणाऱ्या मोकाट डुकरांच्या समस्येला अकोलेकर प्रचंड वैतागले आहेत. एक हजार कोटींच्या विकास कामांचा गवगवा करणाºया सत्ताधारी भाजपसह लोकप्रतिनिधींचा सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाºया समस्यांकडे कानाडोळा का, असा सवाल अकोलेकर उपस्थित करू लागले आहेत.
शहरात स्वच्छ भारत अभियान कागदावर राबवणाºया महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपचे मूलभूत सुविधांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची परिस्थिती आहे. मनपाने शहर हगणदरीमुक्तीसाठी थातूर-मातूर प्रयत्न केले असले तरी डुकरांची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. डुकरांच्या विष्ठेतून परिसरात दुर्गंधी व घातक जिवाणू पसरत असल्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी अकोलेकरांकडून सातत्याने होत आहे. सर्वपक्षीय नगरसेवकच नव्हे तर खुद्द महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्या प्रभागात मोकाट डुकरांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून, नागरिक वैतागले आहेत. सत्ताधारी भाजपच्यावतीने शहरात १ हजार कोटींच्या विकास कामांचा गवगवा केला जात असला तरी प्रत्यक्षात मूलभूत सुविधांची पुरती दाणादाण उडाल्याची परिस्थिती आहे. मोकाट डुकरांमुळे विविध आजार पसरत असून, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरही प्रशासनासह सत्ताधारी भाजपचे व विद्यमान लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का, अकोलेकरांच्या समस्या निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व सत्तापक्षातील पदाधिकारी मनपा प्रशासनाला निर्देश देतील का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
जीवापेक्षा मते महत्त्वाची!
जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये वराह पालनाचा व्यवसाय करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. याव्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समितीलगतच्या विजय नगर, अकोट फैल रस्त्यालगतच्या बापू नगर परिसरात वराह पालक केल्या जाते. यातील बहुतांश व्यावसायिक महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. संबंधित कर्मचाºयांच्या व्यवसायाची मनपा प्रशासनासह नगरसेवकांना संपूर्ण माहिती आहे. मोकाट डुकरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असला तरी केवळ मतांच्या लाचारीपायी नगरसेवकांनी चुप्पी साधणे पसंत केल्याचे दुर्दैवी चित्र आहे.