आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्ह्यातील ६३ कोटींच्या विकासकामांना लागला ‘ब्रेक’
By संतोष येलकर | Published: March 19, 2024 02:56 PM2024-03-19T14:56:26+5:302024-03-19T14:57:08+5:30
या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध यंत्रणांच्या जिल्ह्यातील ६३ कोटी रुपये किमतीच्या नवीन विकासकामांना ‘ब्रेक’ लागला आहे.
अकोला : अकोला लोकसभा मतदारांघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) बाकी असलेली विकासकामे सुरू करता येणार नाहीत. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध यंत्रणांच्या जिल्ह्यातील ६३ कोटी रुपये किमतीच्या नवीन विकासकामांना ‘ब्रेक’ लागला आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात विविध योजना आणि विकासकामांसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, त्यापैकी १३ मार्चपर्यंत १८७ कोटी रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च करण्यात आला असून, उर्वरित ६३ कोटी रुपयांचा निधी खर्च होणे बाकी असतानाच, अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १६ मार्चपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. अखर्चित निधीतील ‘वर्क ऑर्डर’ देण्याची प्रक्रिया बाकी असलेली विकासकामे आचारसंहितेच्या कालावधीत सुरू करता येणार नाहीत. त्या अनुषंगाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीत विविध यंत्रणांची जिल्ह्यातील प्रस्तावित नवीन विकासकामे आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत थांबविण्यात आली आहेत.
२५० कोटी यंत्रणांना वितरित!
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी मंजूर २५० कोटी रुपयांचा निधी १५ मार्चपर्यंत संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे. त्यामध्ये महानगरपालिकासह जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्यसेवा, महावितरण, क्रीडा विभाग, पोलिस विभाग आदी यंत्रणांचा समावेश आहे.
‘या’ कामांसाठी मंजूर आहे निधी!
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यात रस्ते, नाल्या, जलसंधारण, शिक्षण, आरोग्यसेवा, वीजपुरवठा, पशुसंवर्धन, क्रीडा आदी विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लागणार कामे!
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. त्यानुसार, आचारसंहितेत ‘ब्रेक’ लागलेली जिल्ह्यातील विकासकामे आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लागणार आहेत.