"आंबेडकरांची स्क्रीप्ट कोण लिहितं ते आधी पाहा"; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
By राजेश शेगोकार | Published: October 7, 2022 04:22 PM2022-10-07T16:22:40+5:302022-10-07T16:25:32+5:30
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवाचा केलेला उल्लेख खेदजनक असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
अकोला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केलेले भाषण ही भाजपाची स्क्रीप्ट होती असा आरोप धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी केला होता त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरांच्या भाषणाची स्क्रीप्ट कोण लिहते हे आधी पाहा अशा शब्दांत टोला लगावला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अकोल्यात आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की अलीकडे भाषण झाली की भाषणाची स्क्रीप्ट कोणाची हे आरोप करण्याची फॅशनच झाली आहे. आंबेडकरांनीही आरोप केला मात्र त्यांच्या भाषणाची स्क्रीप्ट कोण लिहते हे सुद्धा पहा असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवाचा केलेला उल्लेख खेदजनक असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. उद्धवजींकडून तशी अपेक्षा नाही त्यांनी ते शब्द परत घ्यावेत असे आवाहन फडणवीस यांनी केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावकर उपस्थित होते.
"आदिपुरुषची माहिती घेऊ द्या अन्यथा माझा आदिमानव व्हायचा"
आदिपुरुष चित्रपट येतोय एवढच मला माहीत आहे. त्यामध्ये काय आहे मला माहीत नाही. राम कदमांनी का विरोध केला. मनसेने का पाठींबा दिला याची माहिती मला नाही मला आधी आदिपुरूष बाबत माहिती घेऊन द्या मगच बोलता येईल नाहीतर माझाच आदिमानव व्हायचा अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.
"सर्व कापूस खरेदी करू"
कापसाला बाजारपेठेत हमीभावापेक्षा जास्त भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी कापूस तिकडे विकणे पसंत करतो, जर बाजारपेठेत भाव पडले तर कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर देऊन सर्व कापूस खरेदी करू अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून गेल्या शंभर दिवसात आम्ही खूप चांगले निर्णय घेतले असल्याचा दावा त्यांनी केला.