बालकांमध्ये जंतदोष : २१ सप्टेंबरपासून घरोघरी जंतनाशक गोळ्यांचे वितरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:26+5:302021-09-16T04:24:26+5:30
मुलांमधील जंतदोष निवारण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दरवर्षी शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. वर्षातून दोन वेळा राबविण्यात येणारा हा उपक्रम ...
मुलांमधील जंतदोष निवारण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दरवर्षी शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. वर्षातून दोन वेळा राबविण्यात येणारा हा उपक्रम कोविडमुळे गत वर्षभरापासून ठप्प पडला आहे. यंदाही कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे आशांमार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यात ही मोहीम २१ सप्टेंबरपासून राबविली जाणार आहे. २८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेंतर्गत १९ वर्षापर्यंतच्या बालकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.
काय आहे जंतदोष?
खानपानाद्वारे विविध प्रकारचे जंतू लहान मुलांच्या पोटात जातात. या जंतुंमुळे अन्नातील पौष्टिक तत्त्व मुलांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे मुलांचा शारीरिक विकासही खुंटताे. तसेच विष्टाद्वारेही जंत बाहेर पडू लागतात. त्यामुळे मूल आजारी राहते.
वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
आरोग्य विभागामार्फत वितरित केल्या जाणाऱ्या जंतनाशक गोळ्या १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना दिल्या जातात. जंतदोषाचा सर्वाधिक धोका याच वयोगटातील बालकांमध्ये दिसून येतो.
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
शहरी भागासह प्रत्येक गावात आशा सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे. २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ज्यांना जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत, त्यांनी आपल्या गावातील आशा सेविकेकडे जंतनाशक गोळ्यांची मागणी करावी.
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
आराेग्य विभागामार्फत दरवर्षी जंतनाशक गोळ्यांच्या वितरणाची मोहीम राबविली जाते. वर्षातून दोन वेळा शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जातात. त्यासाठी संबंधित यंत्रणेला प्रशिक्षणही दिले जाते. तसेच गोळ्या दिल्यानंतर मुलांना काय त्रास होऊ शकतो. त्यासाठी काय करावे, या संदर्भातही मार्गदर्शन केले जाते. गत वर्षीपासून गर्भवतींनाही चौथ्या महिन्यात जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत.
बालकांमधील जंत दोष टाळण्यासाठी जिल्ह्यात २१ सप्टेंबरपासून जंतनाशक गोळ्या वितरणाचीही मोहीम राबविली जाणार आहे. शाळा बंद असल्याने यंदा आशा सेविकांमार्फत घरोघरी जाऊन गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे.
- डॉ. मनीष शर्मा, महिला व बालविकास अधिकारी, अकोला