अकोला जिल्ह्यातील चार लाखांवर बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
By प्रवीण खेते | Published: September 23, 2022 10:54 AM2022-09-23T10:54:25+5:302022-09-23T10:55:03+5:30
आरोग्य विभागाचा उपक्रम: बालकांमध्ये जंतदोष टाळण्यासाठी शाळांमध्ये राबविणार मोहीम
अकोला : इन्फेक्शनमुळे मुलांमध्ये जंतदोषाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मुलांमधील हा दोष टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत १० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ४७ हजार १४ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ही मोहीम राबविली जाणार आहे.
मोहिमेसंदर्भात गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, जिल्हा परिषदचे नंदा गिरी, निक्षी कुकर, प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी साजीया नौसर, जिल्हा रुग्णालयाचे के.व्ही जामुळकर आदी उपस्थित होते. मुलांमधील जंतदोष निवारण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दरवर्षी शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. मोहिमेंतर्गत १९ वर्षांपर्यंतच्या ४ लाख ४७ हजार १४ लकांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना १० ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळ्या मिळणार नाही, अशांना १७ ऑक्टोबर रोजी गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे. शिवाय, जे मुलं शाळेत जात नाहीत, अशांना आशांमार्फत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे.
असे आहे उद्दिष्ट
ग्रामीण भाग - २,४४,९३५
शहरी भाग - १,१३,६००
काय आहे जंतदोष?
खानपानाद्वारे विविध प्रकारचे जंतू लहान मुलांच्या पोटात जातात. या जंतुंमुळे अन्नातील पौष्टिक तत्त्व मुलांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे मुलांचा शारीरिक विकासही खुंटताे. तसेच विष्ठेद्वारेही जंत बाहेर पडू लागतात. त्यामुळे मूल आजारी राहते.
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
शहरी भागासह प्रत्येक गावात आशा सेविकांमार्फत जंतनाशक गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे. १० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १,४०४ अंगणवाडी केंद्र, १,०८० शाळा, ३२६ खासगी शाळा, १३ तांत्रिक शिक्षण संस्था, आणि १,१६० आशा सेविकांमार्फत राबविण्यात येणार आहे. ज्या मुलांना शाळेत जंतनाशक गोळ्या मिळाल्या नाहीत, त्यांनी आपल्या गावातील आशा सेविकेकडे जंतनाशक गोळ्यांची मागणी करावी. महापालिका क्षेत्रातील २७० अंगणवाडींना देखील जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणी देखील बालकांना गोळ्यांचे वितरण केले जाणार आहे.