सत्यपाल महाराजांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धरणे-भजन आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 01:09 AM2017-05-20T01:09:48+5:302017-05-20T01:09:48+5:30
पोलीस संरक्षण द्या : आरोपीवर काठोर कारवाई करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करीत, सत्यपाल महाराज यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे व आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गुरुदेव सेवक व पुरोगामी संघटनांच्या वतीने शुक्रवारी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व भजन आंदोलन करण्यात आले.
सुप्रसिद्ध सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईतील नायगाव दादर परिसरात १२ मे रोजी कार्यक्रम संपल्यानंतर माथेफिरूकुणाल जाधव नामक व्यक्तीने जीवघेणा चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सत्यपाल महाराज गंभीर जखमी झाले.
सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधनाचे कार्य अखंड सुरू असून, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा तसेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य ते करीत असून, शासनाचे अनेक समाजोपयोगी उपक्रम खंजिरी भजनाच्या माध्यमातून राज्यभर आणि राज्याबाहेर पोहचविण्याचे कार्य सत्यपाल महाराज करीत आहेत. प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध करून, त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे व आरोपी कुणाल जाधवविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत गुरुदेव सेवक आणि पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व भजन आंदोलन छेडण्यात आले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात अॅड. संतोष भोरे, महादेवराव हुरपडे, डॉ. महेशकुमार मुरकर, संदीप घाटोळ, अशोक जाधव, लुकमान शाह, पी.बी. भातकुले, संजय तुपारे, ज्ञानेश्वर साकरकार, शाहीर वसंत मानवटकर, रामेश्वर बरगट, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार, हरिदास वाघोडे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, मराठा सेवा संघाचे प्रदीप पाटील चोरे, पंकज जायले, अनुप खरारे, राजीव बोचे, मार्तंडराव माळी, प्रभाकर चिंचोळकर, प्रमोद देंडवे, प्रतीक देंडवे, काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश तायडे, श्रीकांत बिहाडे, युवाविश्व संघटनेचे अॅड. संतोष गावंडे, प्रहार संघटनेचे श्याम राऊत, चंद्रकांत झटाले यांच्यासह जिल्ह्यातील गुरुदेव सेवक व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
...तर तीव्र आंदोलन!
सत्यपाल महाराज यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि आरोपीविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा गुरुदेव सेवक, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व पुरोगामी विचारांच्या संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही यावेळी निवेदनात देण्यात आला.