धनश्री भेलोंडे यांचा बेमुदत उपाेषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:19 AM2021-01-03T04:19:44+5:302021-01-03T04:19:44+5:30
मूर्तिजापूर : येथील प्रभाग क्र. ८ मध्ये गत अनेक वर्षांपासून मंजूर असलेली विकासकामे होत नसल्याने व विकासकामातून प्रभागाकडे दुर्लक्ष ...
मूर्तिजापूर : येथील प्रभाग क्र. ८ मध्ये गत अनेक वर्षांपासून मंजूर असलेली विकासकामे होत नसल्याने व विकासकामातून प्रभागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. याविषयी अनेकदा नगर परिषदेत लेखी निवेदन देऊन व तोंडी सांगूनही विकासकामे होत नसल्याने भाजपच्या नगरसेविका धनश्री भेलोंडे यांनी परिवारासह २६ जानेवारीपासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
मूर्तिजापूर नगर परिषदेत भाजपचे सरकार असून भाजप नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाच्या विरुद्ध भाजपच्या नगरसेविका धनश्री भेलोंडे यांनी दंड थोपटले आहेत. स्टेशन विभागातील प्रभाग क्र.८ मध्ये मागील अनेक वर्षांपासून विकासकामे झाली नाहीत. काही कामे मंजूर असूनही ती कामे सुरू केली जात नाहीत. त्यामुळे नागरिकामधे तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. तीन वर्षांपासून एकही विकासकाम झाले नाही. याविषयी अनेकदा निवेदने देऊनही यावर काहीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. या प्रमुख मागण्यांसाठी नगर परिषदेसमोर २६ जानेवारीपासून परिवारासह बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १५ दिवसात कामाला सुरुवात न केल्यास भाजप नगरसेविका धनश्री शैलेश भेलोंडे या पती व दोन मुलींसह २६ जानेवारीपासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी नगरविकास मंत्री, खा. संजय धोत्रे, पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी अकोला, आमदार हरीष पिंपळे, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद, नगराध्यक्ष मोनाली गावंडे यांनाही दिल्या आहेत.