सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी मनपा कर्मचाऱ्यांचे २९ ला मुंबईत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:00 PM2019-08-18T13:00:46+5:302019-08-18T13:01:17+5:30
सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी २९ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा येथे करण्यात आली.
अकोला: महाराष्ट्र शासनाच्या २ आॅगस्ट १९ च्या परिपत्रकानुसार राज्यातील ‘ड’ वर्ग महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील जाचक अटी रद्द करणे व शंभर टक्के सहायक अनुदान मंजूर करण्यासाठी राज्यातील महापालिकेच्या सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांचा मेळावा शनिवारी अकोल्यात पार पडला. शासनाच्या कंत्राटी कर्मचारी पद्धतीला कडाडून विरोध करण्यासाठी आणि सातव्या वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी २९ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा येथे करण्यात आली.
राज्य शासनाच्या कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्याच धर्तीवर राज्यातील ३५० नगर पंचायती आणि २८ महापालिकेतील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, सर्व कंत्राटी कर्मचाºयांना कायम करावे, नियमित सेवा विभागात कंत्राटी पद भरण्यात येऊ नये, आश्वासित पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, मयत कामगाराच्या वारसाला २० लाख रुपये पेन्शन अनुदान द्यावे, पोलीस कर्मचाºयांप्रमाणे मनपा कामगारांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सेवा द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समान वेतन समान काम देण्यात यावे, मासिक वेतन महिन्याच्या ७ तारखेच्या आत द्यावे, नगरपालिकेच्या सीईओ पदाच्या अधिकाºयास मनपाच्या उपायुक्त पदापर्यंत पदोन्नती दिली जाते; मात्र इतर अधिकाºयांना अधीक्षक पदापुढे जाता येत नाही, ही अट शिथिल करावी, सफाई कामगारांना घरकुल योजनेत सहभागी करून घ्यावे, कामगार संघटनेच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २९ आॅगस्ट रोजी मुंबईत लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येईल. त्याची दखल घेण्यात आली नाही तर साडेचार लाख कामगार कुटुंबीय आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालतील, असे ठराव अकोल्यातील मेळाव्यात घेण्यात आले. अकोला महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेला राज्यव्यापी मेळावा चरणसिंग टाक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन आमदार रणधीर सावरकर आणि आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर विजय अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे अॅड. सुरेश ठाकूर, रामगोपाल मिश्रा, विश्नाथ घुगे, अॅड. सुखदेव काशीद, राजन सुतार, बबन झिजुर्डे, शब्बीर विद्रोही, अकोल्यातील पी.बी. भातकुले, अनुप खरारे, विठ्ठलराव देवकते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले.