अकोटच्या दिव्यांग धिरजने वानरलिंग सुळक्यावर फडकावला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 12:02 PM2020-01-27T12:02:39+5:302020-01-27T12:19:28+5:30
सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अवघ्या २ तास १५ मिनिटांत २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सर केला.
- विजय शिंदे
अकोट: अकोला जिल्ह्यातील अकोट येथील गियार्रोहक धिरज कळसाईत यांनी महाराष्ट्रातील जुन्नर तालुक्यातील नानेघाटात वसलेला अतिशय अवघड असा, जमिनीपासुन सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अवघ्या २ तास १५ मिनिटांत २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सर केला. याठिकाणी तिरंगा फडकविला, राष्ट्रगित व सलामी दिली.सर्वोच्च उंच हिमशिखर माऊंट एव्हरेस्ट मोहीमेवर जाण्याचा संकल्प धिरजने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील वानरलिंगी सुळका भल्या भल्या गियार्रोहकांना आवाहन देणारा कडा आहे.जमिनीपासुन सुमारे ४५० मीटर उंच असलेला हा सुळका सरळ ९० अंश कोनात ताठ मानेने उभा आहे. या सुळक्याची गणना गियार्रोहण क्षेत्रात अतिकठीण श्रेणीत केली जाते. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठीसुद्धा वांद्रे गावातून 3 तासांची अतिशय दमछाक करावी लागते.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, सुळक्यावर तिरंगा फडकावण्याचा मानस राखुन, धिरज आणि त्यांचे सहकारी शनिवारी २५ जानेवारी रात्री ९ च्या सुमारास पुण्याहून जुन्नरला निघाले. २६ जानेवारी सकाळी सुमारे ६ वाजता वानरलिंगी सुळका प्रस्तरोहन चालू केले. सुळक्याची ९० अंशाची ठेवण हेच याचे वैशिष्ट्य. त्यामुळे ही चढाई अतिशय कठीण होऊन जाते. पण या सगळ्याचा विचार केला तर तो धिरज कसला. अनेक मोहीमांचा अनुभव असलेल्या धिरजने अवघ्या २ तास १५ मिनिटांत हा सुळका सर केला.धिरज कळसाईत सोबत बाल गियार्रोहक साई कवडे ,महाराष्ट्र पोलिस दलातील तुषार पवार यांनी पॉईंट ब्रेक अॅडव्हेन्चर टिम सोबत होते. एका पायाने व हाताने दिव्यांग असून आतापर्यंत कळसूबाई शिखर, लिंगाना सुळका, कळकराई सुळका आणि खडतर असा वजीर सुळका सर केला असुन महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांवर यशस्वीरित्यागियार्रोहण केले आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आॅफ्रीकेतील माऊंट किली मंजारो (उंची ५८९५मीटर) हे हिमशिखर २६ जानेवारी २०१९ रोजी आणि रशियातील माऊंट एलब्रुस ( उंची ५६४२ मीटर ) हेहिमशिखर १५ आॅगस्ट २०१९ रोजी यशस्वीरित्या सर केले आहेत. त्यांची दखल घेत इंडिया व महाराष्ट्र बुकांत त्यांची नोंद झाली आहे.