अतिसार, ग्रॅस्ट्रोचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 07:25 PM2017-07-19T19:25:45+5:302017-07-19T19:35:52+5:30
दूषीत पाण्याचा परिणाम : ‘सर्वोपचार’मध्ये रुग्णांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाळा सुरु होऊन दिड महिना उलटून गेल्यानंतर आता खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दुषीत झाल्याने जलजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गत चार दिवसांमध्ये येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये अतिसार व गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
पावसाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव व थंड वातावरण यामुळे वातावरणात रोगजंतुचा प्रादूर्भाव वाढतो. सर्वत्र घाण साचल्याने भूमिगत जलस्त्रोत दूषित होतात. तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्तीही वाढीस लागते. रोगजंतूंसाठी असे पोषक वातावरण निर्माण झाल्याने जिल्ह्यात विविध रोगांनी डोके वर काढले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार, जुलाब, हगवण अशी लक्षणे असलेले रुग्ण घराघरांमध्ये आढळून येत आहेत. तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे असलेले रुग्णही दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. सर्वोपचार रुग्णालयासह खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे चित्र आहे.
ओपीडी फुल्ल; डॉक्टरांची वानवा
पावसाळ्यात विविध आजारांनी डोके वर काढल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध डॉक्टरांवर ताण येत आहे. सर्वोपचारमध्ये दररोज साधारणपणे दोन हजार रुग्ण उपचारासाठी येतात; परंतु गत चार दिवसांपासून हा आकडा २२०० ते २४०० च्या घरात गेला आहे.
सर्वोपचारमध्ये दाखल रुग्ण
आजाररुग्ण
अतिसार- ४३
गॅस्ट्रो - १६
टायफाईड - २१
ताप - ६४
पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने रोगजंतुना तो पोषक ठरतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. पाणी उकडून पीणे, उघड्यावरील पदार्थ न खाने, स्वच्छता बाळगणे अशा प्रकारच्या खबरदारी घेतल्यास आजारांपासून बचाव करता येतो. आजारी पडल्यास आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन उपचार करून घ्यावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण,
जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला