शिक्षक परिषदेशी फारकत भाजपला पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:11 PM2020-12-14T23:11:11+5:302020-12-14T23:15:02+5:30
शिक्षक परिषदेने आपले उमेदवार रिंगणात कायम ठेवले असतानाही भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची केलेली खेळी अंगलट आली आहे.
- राजेश शेगाेकार
अकाेला : राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने शिक्षक मतदारसंघ जिंकण्याच्या भाजपच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले आहे. भाजपाची मातृसंस्था असलेल्या संघ परिवाराच्या संबंधातील शिक्षक परिषदेने आपले उमेदवार रिंगणात कायम ठेवले असतानाही भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची केलेली खेळी अंगलट आली आहे.
राजकीय पक्षांनी दिलेले अधिकृत उमेदवार व शिक्षक संघटना आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली हाेती. त्यामध्ये भाजपाची शिक्षक शाखा असलेल्या संघटनेचाही उमेदवार रिंगणात असतानाही भाजपाने उमेदवार देण्याचा प्रयाेग करून हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला हाेता; मात्र अमरावती, पुणे या दाेन्ही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पहिल्या तीन उमेदवारांमध्येही स्थान मिळवू शकले नाहीत. अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपने डाॅ. नितीन धांडे यांच्या रूपाने पहिल्यांदाच उमेदवार दिला; मात्र उमेदवारासंदर्भातच नाराजी असल्याचे सुरुवातीपासूनच भाजपाचा उमेदवार शर्यतीबाहेर असल्याचे चित्र हाेते, ते निकालांवरून स्पष्ट झाले. पुण्यातही काॅंग्रेसचे जयंत आसगावकर यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम ठेवली. शिक्षक मतदार असलेल्या या निवडणुकीत भाजपाने पक्षाच्या नेत्यांच्याच भरवशावर रणनीती आखल्यामुळे शिक्षकांपर्यंत हे नेते पाेहोचलेच नाहीत. साेबतच गेल्या कार्यकाळात भाजपाने सत्ता असूनही शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा फटकाही भाजपला बसला आहे. शिक्षक परिषद ही मातृसंस्था असून, वर्षभर शिक्षकांच्या प्रश्नांवर ही संघटना काम करते. या संघटनेला विश्वासात न घेता भाजपाने स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे या संघटनेचेही महत्त्वही कमी करण्याचा केलेला प्रयत्न अंगलट आला आहे.
पुणे, नाशिक, मुंबईत झाला हाेता पराभव
राज्यातील शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी झालेल्या निवडणुकींचा मागाेवा घेतला असता भाजपाचा उमेदवारी प्रयाेग फसल्याचीच उदाहरणे आहेत. नाशिक मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेने बाजी मारली. तेथे सेनेेचे किशाेर दराडे विजयी झाले हाेते. येथे भाजपचे अनिकेत पाटील तिसऱ्या क्रमांकावर हाेते. पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष दत्तात्रय सावंत यांनी हा मतदारसंघ ताब्यात ठेवत विजय मिळविला हाेता. येथेही भाजपचे भगवानराव साळुंके तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले हाेते. मुंबई मतदारसंघात कपिल पाटील यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत हा मतदारसंघ जिंकताना भाजपचे अनिल देशमुख यांना तिसऱ्या स्थानी राेखले हाेते. यावेळीसुद्धा भाजपाने शिक्षक मतदारसंघात उमेदवार देऊन पुन्हा एकदा पराभवाची नामुष्की पत्करली आहे.