तेल्हारा तालुक्यात डिजिटल शाळा मोहीम थंडावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:40 PM2017-11-20T22:40:31+5:302017-11-20T22:48:56+5:30
सुरुवातीला वेगाने डिजिटल होणार्या शाळांचे प्रमाण गेल्या चार ते पाच महिन्यात बोटावर मोजण्याइतपत आले आहे. तेल्हारा तालुक्यातील १५७ शाळांपैकी केवळ ४२ शाळाच डिजिटल झाल्या असून, त्याही मोहीम सुरू झाल्यानंतरच झाल्या होत्या.
सदानंद खारोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : शिक्षण विभागाने गेल्यावर्षी थाटात सुरू केलेली डिजिटल शाळेची मोहीम तेल्हारा तालुक्यात थंडावल्याचे चित्र आहे. सुरुवातीला वेगाने डिजिटल होणार्या शाळांचे प्रमाण गेल्या चार ते पाच महिन्यात बोटावर मोजण्याइतपत आले आहे. तालुक्यातील १५७ शाळांपैकी केवळ ४२ शाळाच डिजिटल झाल्या असून, त्याही मोहीम सुरू झाल्यानंतरच झाल्या होत्या.
विद्यार्थ्यांना आधुनिक साहित्याचा वापर करून शिकविल्यास त्यांची उत्सुकता वाढेल, वर्गातील उपस्थिती वाढण्यात मदत होईल व विद्यार्थ्यांचे लक्ष जास्त वेळ केंद्रित राहील, या उद्देशाने राज्यातील सर्व शाळांमध्ये डिजिटलसयंत्र बसविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते; मात्र अपवाद वगळता राज्य शासनाने निधीसाठी कोणतीही तरतूद केली नाही. लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसे गोळा करून शाळांमध्ये डिजिटल सयंत्र खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. २0१७ पर्यंत सर्वच शाळा डिजिटल करण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे शिक्षक अध्यापन करायचे सोडून लोकवर्गणीसाठी जोड देऊन शाळा डिजिटल केल्या व निम्या शाळांनी मात्र शासनाच्या निर्देशाकडे साफ दुर्लक्ष केले.
तालुक्यात जिल्हा परिषद व खासगी १५७ शाळा असून, केवळ ४२ शाळाच डिजिटल झाल्या. मे २0१७ पासून म्हणजे गेल्या सहा तालुक्यातील ९0 टक्के शिक्षकांना १0 वर्षे झाल्याने मे २0१७ पासून राज्यस्तरीय बदली प्रक्रिया सुरू असल्याने सर्व शिक्षकांचे लक्ष ऑनलाइन बदलीकडे लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांचे डिजिटल शाळेकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढणे त्यांना कठीण झाले. यावर्षीच्या सत्रात मात्र शिक्षण विभागाने डिजिटल शाळांचा आढावा घेणे जवळपास बंद केले, त्यामुळे शिक्षकांनीही डिजिटल साधने खरेदी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, मार्च २0१७ पर्यंत जेवढय़ा शाळा डिजिटल झाल्या, त्यामध्ये अगदी मोजक्या शाळेची भर पडली आहे.
बहुतांश शाळांमधील डिजिटल साधने धूळ खात!
शासनाच्या दबावानंतर काही शिक्षकांनी लोकवर्गणी करून वेळप्रसंगी स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून डिजिटल साधने खरेदी केली. या साधनाच्या साह्याने काही काळ अध्यापन केले. यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात मात्र डिजिटल साधनांचा वापर अध्यापन करताना अत्यंत कमी प्रमाणात केल्या जात आहे. त्यामुळे खरेदी केलेले साहित्य धूळ खात आहे.
शिक्षण विभागाचे नवीन उपक्रम थांबले
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्यावतीने दर महिन्याला नवनवीन उपक्रम शोधून काढले जात होते. सदर उपक्रम इच्छा नसतानाही शिक्षकांच्या माथी मारले जात होते. याला शिक्षक संघटनेने विरोध केल्याने कोणतेही उपक्रम राबविणे सध्या तरी बंद आहे.
तेल्हारा तालुक्यातील सर्व शाळा या सत्रात डिजिटल व प्रगत करण्याचा निश्चय शिक्षण विभागाने घेतला आहे.
- विलास धमाडे, शिक्षणाधिकारी, पं.स. तेल्हारा.