दिग्रस बु. परिसरात अवैध वृक्षतोड जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:21 AM2021-09-21T04:21:05+5:302021-09-21T04:21:05+5:30
दिग्रस बु: आलेगाव वनविभागांतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. परिसरात अवैध वृक्षतोड वाढली असून, याकडे वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र ...
दिग्रस बु: आलेगाव वनविभागांतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. परिसरात अवैध वृक्षतोड वाढली असून, याकडे वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. दिग्रस बु. ते लावखेड रस्त्यावर वृक्षतोड करून, अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
दिग्रस बु. परिसरातील वाडेगाव-तुलंगा-दिग्रस, सस्ती-सुकळी या मुख्य रस्त्यावर भर दिवसा हिरवे वृक्ष तोडले जात असल्याचे चित्र मागील कित्येक दिवसांपासून दिसून येत आहे. लाकूड माफिये पहाटेच्या सुमारास वृक्षतोड करून अवैध वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत वृक्षप्रेमींनी विचारणा केली असता, परवानगी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक या मार्गावर कोणतीही परवानगी नसूनही ३० ते ४० वृक्षांची कत्तल केल्याचे समोर आले आहे. सस्ती-दिग्रस, सुकळी-चान्नी फाटा या मार्गावरील वृक्षांचीही कटाई करण्यात आली आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे. वृक्षतोड तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी गोविंद पाटील, सुमेध हातोले, मनोज गवई, प्रतीक गवई आदींनी केली आहे.
----------
या भागात अवैध वृक्षतोड
वृक्ष लागवडीसाठी प्रशासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, दिग्रस बु. परिसरातील सस्ती, चान्नी फाटा, तुलंगा, सुकळी आदी शिवारांत मागील कित्येक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे, तसेच वाडेगाव-दिग्रस-लावखेड, सस्ती-सुकळी आदी रस्त्यांवर भरदिवसा अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे चित्र आहे.