दिग्रस खुर्द-दिग्रस फाटा रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:20 AM2021-07-29T04:20:00+5:302021-07-29T04:20:00+5:30
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द-दिग्रस बु. या रस्त्याचे मागील कित्येक वर्षांपासून काम सुरू होते. पावसाळा सुरू होताच ...
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द-दिग्रस बु. या रस्त्याचे मागील कित्येक वर्षांपासून काम सुरू होते. पावसाळा सुरू होताच या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत बंद पडले. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.
गत दोन वर्षापासून दिग्रस खुर्द-दिग्रस फाटा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. दिग्रस बु.-दिग्रस खुर्दपर्यंत एकूण तीन किलोमीटर अंतराचा आहे. रस्त्यावर मुरूम, खडी टाकण्यात आली आहे. या खडीमुळे वाहनांचे नुकसान होत असून, वाहन चालविताना चालकास कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. पातूरला जाण्यासाठी परिसरातील गावातील ग्रामस्थांना हा एकमेव मार्ग असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी मंगेश इंगळे, बाळा इंगळे, सुरेश इंगळे, जीवन इंगळे, डिगंबर फाटकर, संदीप फाटकर, बाळू डाबेराव आदींनी केली आहे.
--------------------
रस्त्याचे काम पूर्ण व्हायला पाहिजे होते, परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. त्वरीत काम न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
-मंगेश प्रीतम इंगळे, ग्रा. पं. सदस्य, दिग्रस खुर्द.
--------------
रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे वाहनचालक, शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे .त्यामुळे रस्ता तत्काळ दुरुस्ती करावा.
-जीवन उपर्वट, प्रहार सेवक, हिंगणा, पातूर.
-----------------
अपघाताची शक्यता वाढली
दिग्रस खुर्द-दिग्रस फाटा रस्त्याचे काम संथ सुरू असून, या रस्त्यावर मुरूम, खडी टाकण्यात आली आहे. पावसाळ्यात यावरील खडी उखडून बाहेर निघाली आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करीवी लागत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे.