वाहक-चालक ठरविणार एसटीची दिशा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:41+5:302021-09-25T04:18:41+5:30
अकोला : कोणत्या मार्गावर प्रवाशांची गर्दी सर्वाधिक राहते व एसटीला चांगले उत्पन्न प्राप्त होऊ शकते, याबाबतची माहिती वाहक-चालकांना असते; ...
अकोला : कोणत्या मार्गावर प्रवाशांची गर्दी सर्वाधिक राहते व एसटीला चांगले उत्पन्न प्राप्त होऊ शकते, याबाबतची माहिती वाहक-चालकांना असते; परंतु फेऱ्यांचे वेळापत्रक, मार्ग, थांबा तयार करताना त्यांच्या माहितीचा योग्य वापर करण्यात येत नाही. याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे आता वाहक-चालकांच्या सूचनांप्रमाणे एसटीचे वेळापत्रक, मार्ग व थांबा ठरविण्यात येणार असल्याची एसटी महामंडळाकडून मिळाली आहे. गत पाच वर्षांच्या काळात एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहे. त्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षांपासून एसटीची प्रवासीसेवा कधी बंद तर कधी सुरू, अशा अवस्थेत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक तोटा वाढला आहे. निर्बंध हटल्यानंतरही बहुतांश फेऱ्यांना प्रवासी मिळत नसल्याने डिझेल खर्चही निघणे कठीण झाले आहे. दरम्यान, एसटी महामंडळामध्ये चालक-वाहक हे प्रमुख घटक आहे. सर्व नियतांच्या फेऱ्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्यांच्यामार्फत केली जाते; परंतु प्रत्यक्ष फेऱ्यांचे वेळापत्रक तयार करताना त्यांना दुर्लक्षित केल्या जाते. परिणामी, एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता या वाहक-चालकांच्या सूचनांनुसार प्रत्येक आगाराचे वेळापत्रक ठरणार आहे. त्यामुळे प्रवासी मिळण्यासोबत उत्पन्नवाढही होणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
विभागातील बसेसची संख्या ३८३
विभागातील कर्मचारी संख्या २,४६२
या सूचना देणार
एसटीचे वेळापत्रक ठरविण्यासोबत बस कोणत्या मार्गाने जाणार, एसटीला थांबा कुठे-कुठे राहणार, वाहनांचा प्रकार, नवीन गाडी सुरू करण्याबाबतही वाहक-चालकांच्या सूचना लक्षात घेण्यात येणार आहे.
विभागीय कार्यालयांना पत्र
प्रवासी वाहतूक नियंत्रणात वाहक-चालकांच्या सूचना लक्षात घेऊन प्रवासीभिमुख सेवा व उत्पन्नवाढीसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. याबाबतचे पत्र विभागीय कार्यालयांना उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी पाठविले आहे.
असे मिळाले निर्देश
वाहक-चालकांकडून मिळालेल्या सूचनांचा आगार व्यवस्थापक यांनी पडताळणी करून सूचना आगार पातळीवरची असल्यास तत्काळ अंमलबजावणी करावी, सूचना विभागीय पातळीवरची असल्यास विभाग नियंत्रकांकडे पाठविण्यात याव्या. आगार व विभाग पातळीवर सूचनांचे रजिस्टर ठेवण्यात यावे, असे निर्देश पत्रात दिले आहे.
वाहक-चालक हा एसटी महामंडळामधील प्रमुख घटक आहे. तो प्रत्येक रस्त्यावर चालणारा कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्यांच्या सूचना लक्षात घेतल्यास महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणे शक्य आहे.
- रुपम वाघमारे, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य एसटी संघटना