‘एमपीएससी’च्या परीक्षा केंद्रात दिव्यांग उमेदवाराला प्रवेशासाठी मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:59 PM2019-06-17T12:59:18+5:302019-06-17T12:59:24+5:30
अकोला : राज्यभरात रविवारी राज्यसेवा गट ‘क’ परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान अकोल्यात एका दिव्यांग परीक्षार्थीला लेखनिक उपलब्ध नसल्याने परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
अकोला : राज्यभरात रविवारी राज्यसेवा गट ‘क’ परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान अकोल्यात एका दिव्यांग परीक्षार्थीला लेखनिक उपलब्ध नसल्याने परीक्षेसाठी प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला; मात्र कालांतराने दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यस्थीने लेखनिकासह त्या परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला.
राज्यसेवा गट ‘क’ पदासाठी रविवारी अकोल्यातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान अकोल्यातील बी.आर. हायस्कूल या परीक्षा केंद्रावर सचिन घायवळ नामक एका अंध परीक्षार्थीस प्रवेश नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. परीक्षार्थी अंध असल्याने त्याला लेखनिकाची गरज होती; परंतु ऐन वेळेवर लेखनिक उपलब्ध नसल्याने परीक्षा केंद्रावरील अधिकारी व निरीक्षकांकडून त्याला त्याला प्रवेश नाकारण्यात आला. तेवढ्यात सचिनच्या एका मित्राने या प्रकाराची माहिती दिव्यांग आर्ट गॅलरीला दिली. घटनेची माहिती मिळताच दिव्यांग आर्ट गॅलरीचे सदस्य प्रा. नितीन सातव यांनी परीक्षा केंद्र गाठले. परिस्थितीचा आढावा घेत परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना नियमाची उजळणी करून देत त्या अंध परीक्षार्थीला त्याचा हक्क मिळवून दिला. सोबतच लेखनिक बँकेच्या माध्यमातून लेखनिक उपलब्ध करून दिल्याने अंध परीक्षार्थी सचिन घायवळ याला दिलासा मिळाला.
काय म्हणतो नियम...
नियमाप्रमाणे कुठल्याही दिव्यांग व्यक्तीला वाचक तसेच लेखनिक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असते. त्यानुसार, ‘एमपीएससी’मार्फत दिव्यांग परीक्षार्थीला लेखनिक उपलब्ध करून देणे आवश्यक होते; परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही.
दिव्यांग विद्यार्थी किंवा परीक्षार्थीला वाचक किंवा लेखनिक पुरविण्याची जबाबदारी परीक्षा घेणाºया यंत्रणेची असते; परंतु तसे होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश नाकारणे योग्य नाही. कायद्याने त्यांना अधिकारही दिला आहे. दिव्यांग आर्ट गॅलरी वाचक, लेखनिक राज्यभरातील विद्यार्थ्यांना पुरविण्याचे काम करते.
- प्रा. विशाल कोरडे, अध्यक्ष, दिव्यांग आर्ट गॅलरी, अकोला.