एक दिव्यांग दुसऱ्या दिव्यांगाला आपल्या 'थ्री व्हीलर'ने मतदानासाठी नेणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 04:04 PM2019-03-23T16:04:56+5:302019-03-23T16:05:14+5:30
अकोला: दिव्यांगांचा मतदानामध्ये टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिव्यांग मतदार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे
अकोला: दिव्यांगांचा मतदानामध्ये टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिव्यांग मतदार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यावेळी महासंघाचे राज्य सहसचिव प्रकाश अवचार यांनी दिव्यांग व्यक्ती आपल्या थ्री व्हीलरवर दुसºया दिव्यांगाला मतदानासाठी नेणार आहे, असा निर्धार राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने केला असल्याचे माहिती दिली. या आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना दिले.
जिल्ह्यातील दिव्यांगांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, याकरिता राष्ट्रीय विकास महासंघाचे योगदान राहणार आहे. जिल्ह्यात असणाºया मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांना मतदान करण्याकरिता स्वत: मोटारसायकलने नेणार आहेत, तसेच त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य सहसचिव प्रकाश अवचार यांच्यासह तुळशीराम गुंजकर,संगीता ठोंमरे, विठ्ठल होरे, कृष्णा करपे, गणेश सोनटक्के, हरिभाऊ सावतकर, निरंजन इंगळेसह असंख्य दिव्यांग बांधव सहकार्य करणार आहेत.
समितीचे गठन
दिव्यांगांचा मतदानामध्ये टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग मतदारांसाठी जिल्हास्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. यात जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, मनपाचे दिव्यांग कक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्य अपंग दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अपंग बेरोजगार संघटना, राज्य अपंग विकास महासंघ, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आदी विभागांचा सहभाग आहे. या समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी यांचे दालनात घेण्यात आली.