वैद्यकीय चाचणीसाठी दिव्यांग वेटिंगवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:33 PM2019-12-03T14:33:47+5:302019-12-03T14:33:56+5:30
वैद्यकीय चाचण्या होत नसल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्रापासून उपेक्षित राहावे लागत आहे.
अकोला : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज करूनही दिव्यांगांची वैद्यकीय चाचण्यांसाठी चार ते पाच महिने प्रतीक्षेत राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. वैद्यकीय चाचण्या होत नसल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्रापासून उपेक्षित राहावे लागत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांसाठी दिव्यांग कक्षाची स्थापना होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचण्यांसाठी येथे बोलाविण्यात येते. या वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्यानंतरच दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्या जाते; मात्र मागील काही महिन्यांपासून दिव्यांगांनी आॅनलाइन अर्ज करूनही त्यांना तपासणीची तारीख देण्यात येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिव्यांग कक्षाकडून कुठल्याच प्रकारचा संदेश न आल्याने बहुतांश दिव्यांग थेट कक्षाला भेट देऊन विचारणा करतात. त्यानंतर त्यांना दोन ते तीन दिवसांनंतरची तारीख दिल्या जाते. ज्या दिव्यांगांनी केंद्राला भेट दिली नाही, त्यांना क्वचितच तपासणीचा दिवस संदेशाद्वारे कळविण्यात येत असल्याचा प्रकार घडत आहे. या प्रकारामुळे अनेक दिव्यांगांना फटका बसत असून, त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
अजब कारभारामुळे दिव्यांग त्रस्त
आॅनलाइन अर्ज करूनही वैद्यकीय चाचणी होत नाही. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष दिव्यांग कक्षाला भेट द्यावी लागत आहे. या ठिकाणी आल्यावर काहींना तपासणीची तारीख दिली जाते, तर काहींना उलटसुलट उत्तरे देत अद्याप तपासणीचा नंबर लागला नसल्याचे सांगण्यात येते. अशा अजब कारभारामुळे एका दिवसाच्या कामासाठी दिव्यांगांना हेलपाटे घेत वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
आॅफलाइन अपॉइंटमेंटमुळे मिळणार दिलासा
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर दिव्यांगांना आता आॅफलाइन अपॉइंटमेंट घेऊन पुढील वैद्यकीय तपासणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मर्यादित कालावधीतच दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार आहे; परंतु यासाठी अद्यापही अपंग कल्याण आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली नाही.