दिव्यांगांना केवळ सहानुभूती नको; प्रत्यक्ष मदतीचा आधार हवा : बच्चू कडू
By संतोष येलकर | Published: October 3, 2023 07:33 PM2023-10-03T19:33:21+5:302023-10-03T19:33:42+5:30
दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ अन् प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम
अकोला : गेल्या ७५ वर्षांत दिव्यांगांना साधे घरही मिळाले नसल्याचा आरोप करीत, दिव्यांगांना केवळ सहानुभूती नव्हे तर प्रत्यक्ष मदतीचा आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करून दिव्यांगांना ताकद दिली पाहिजे, असे प्रतिपादन ‘दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केले.
‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत अकोल्यातील पोलिस लाॅन येथे आयोजित दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ आणि विविध प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हास्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने आमदार किरण सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड, सहायक आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ४५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकूल, निर्वाह भत्ता आदी विविध योजनांच्या अनुदानाचे धनादेश व कृत्रिम अवयवाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच दिव्यांग कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण आदी विविध विभागांच्या ३८ कक्षांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी, तर संचालन मनीषा शेजोळे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
दिव्यांगाना दरमहा ५ तारखेच्या
आत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे !
सरकारकडून अधिकारी, कर्मचारी, आमदार, खासदारांना वेळेवर पगार दिला जातो; मात्र दिव्यांगांना दरमहा दिले जाणारे अर्थसाहाय्य तीन ते सहा महिने मिळत नाही, असे सांगत दिव्यांगांना दरमहा ५ तारखेच्या आत अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे बच्चू कडू यांनी यांनी स्पष्ट केले.
दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या !
घरकूल, अंत्योदय आदी याेजनांचा लाभ मिळाला नसल्याने दिव्यांगांना किमान रोजगार तर द्या, अशी मागणी करीत दिव्यांगांना हक्कासाठी लढावे लागेल, असे कडू यांनी सांगितले.