वंचित तीन गावांत सुरू झाली मानव विकास मिशनची बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 08:19 PM2017-08-22T20:19:19+5:302017-08-22T20:22:09+5:30
पातूर : चिखलगावनजीकच्या वाघजाळी, वरखेड, गोटखेड गावातील मुलींना पातूरला शाळेत जाण्या-येण्यासाठी मानव विकास मिशनची बस १८ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसचा लाभ मुलींना मिळावा म्हणून खासदार धोत्रे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने १८ तारखेला गावात बस आल्यानंतर शाळेच्या मुलींनी व पालकांनी बसचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क

पातूर तालुक्यात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना त्यांच्या शाळेत जाण्या-येण्यासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था केली आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या एसटी बसने गावापर्यंत मुलींना पोहोचून दिले जाते. पातूरजवळील शाळांमध्ये चिखलगाव येथील मुलींना नेण्यासाठी बस येते. चिखलगावपासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या बाश्रीटाकळी तालुक्यातील वाघजाळी, वरखेड व गोटखेड येथील मुली पातूरला शिकण्यासाठी येतात; परंतु बाश्रीटाकळी तालुक्यात असणार्या या गावांमध्ये एसटीची एकही बस जात नव्हती. त्यामुळे या गावातील मुलींना मिळेल त्या वाहनाने पातूरच्या शाळेत जावे लागत होते. परिणामी, या मुलींची गैरसोय होत होती. ही बाब या तिन्ही गावांतील मुलींच्या पालकांनी नांदखेड येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर इंगळे यांना सांगितली. इंगळे यांनी खासदार संजय धोत्रे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर खा. धोत्रे यांनी याबाबत पुढाकार घेऊन एसटी महामंडळाच्या अधिकार्यांशी पत्रव्यवहार केला. मानव विकास मिशन अंतर्गत योजनेतील बस वाघजाळी, वरखेड, गोटखेड येथे मुलींना नेण्या-आणण्यासाठी पाठवावी, यासाठी प्रयत्न केले.
खासदार धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर १८ ऑगस्टपासून मानव विकास मिशन अंतर्गत एसटी बस शाळेतील मुलींना जाण्या-येण्यासाठी उपलब्ध झाली.