नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अस्वस्थता - जितेंद्र आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:56 PM2020-01-13T13:56:42+5:302020-01-13T13:56:48+5:30
देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जेवढी अस्वस्थता मुस्लीम समुदायामध्ये आहे, तेवढीच हिंदू समाजामध्ये आहे. देशातील ६ हजार ७०० जातींच्या रहिवासाचे मूळ पुरावेच कधी चातुर्वर्ण्य व्यवस्थेने निर्माण होऊ दिले नाहीत. देशातील हिंदू-मुसलमान संविधानाची लढाई अंतिम श्वासापर्यंत लढतील, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माणमंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते पातूर येथे गोंधनी मैदानावर हिंदू-मुस्लीम तथा सर्व जनसमुदायाच्या तीने आयोजित जन आक्रोश सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी काझी मो. सरफराझ होते.
यावेळी पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, आम्ही सर्व संविधानासोबत आहोत. आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार मोदी-शाह यांना नाही. आपला देश स्वतंत्र आहे. गांधींनी स्वातंत्र्य दिले; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मानवता दिली. संविधानाला आम्ही हात लावू देणार नाही. मनु तुम्हाला नेहमीच पायाखाली ठेवतो, बरं झालं आम्हाला या कायद्यामुळे जात व्यवस्था कळली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुरून टाकलेल्या मनुवादी व्यवस्थेचा पुनर्जन्म करण्याचा घाट घातला जातो. जिथे मनु दिसेल, तिथे जाळून टाकू. आता हिंदू-मुसलमानांसह सर्वांचा देशासाठी लढा सुरू झाला, असेही आव्हाड म्हणाले.
मंचावर अ. रशिद, मुफ्ती अशपाक, काझी तौसिफ, मौलाना वसिऊल्ला, यासिनखान, हाफिज आरिफरजा, अ. करीम बज्मी, अॅड. काझी अहमद अली, माजी नगराध्यक्ष हिदायत खान रूमखा, माजी नगराध्यक्ष हाजी सय्यद बुºहान, पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर, पातूर न.प. उपाध्यक्ष सै. मुजाहिद सै. मोहसिन, माजी सरपंच दीपक इंगळे, शेतकरी जागर मंचचे मनोज तायडे, बामसेफचे अमोल इंगळे, निर्भय पोहरे, मनोहर खंडारे, दिनेश पोहरे व मो. मेहताब अ. रऊफ उपस्थित होते. संचालन प्रा. समशेर उलहक, नदिम शाह यांनी केले. आभार आरिफ उर्ररहमान यांनी मानले. सभेला पातूर शहर आणि तालुक्यातील हिंदू-मुस्लीम तथा सर्व समाजाचे नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)