आयुक्तांना मागितला खुलासा
By admin | Published: August 5, 2016 01:36 AM2016-08-05T01:36:20+5:302016-08-05T01:36:20+5:30
महापालिका पदाधिका-यांना कोणतीही माहिती देण्यापूर्वी आयुक्तांची पूर्वपरवानगी बंधनकारक.
अकोला: महापालिका पदाधिकार्यांना कोणतीही माहिती देण्यापूर्वी आयुक्तांची पूर्वपरवानगी बंधनकारक असून प्रशासनाच्या परवानगीशिवाय माहिती देणे, पदाधिकार्यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे परिपत्रक आयुक्त अजय लहाने यांनी जारी केले होते. याप्रकरणी सत्ताधारी भाजपने शासनाकडे तक्रारी केल्यानंतर आयुक्तांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
महापालिकेच्या कोणत्याही विभागातील फाइल बोलावून त्यांची पडताळणी करण्याची मनपा पदाधिकार्यांची कार्यशैली पालिकेत मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. प्रशासकीय दस्तावेजांमध्ये खोडतोड करण्याचेही प्रकार होतात. त्यामुळे फाइलवर शेरा मारणारे अनेक अधिकारी कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. या बाबी लक्षात घेऊन आयुक्त अजय लहाने यांनी आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय असे कोणतेही दस्तावेज, फाइल पदाधिकार्यांना देण्यासाठी विभाग प्रमुखांना मनाई केली. तसेच प्रशासनाच्या परवानगीशिवाय पदाधिकार्यांच्या बैठकांना हजर न राहण्याचे परिपत्रक जारी केले होते. आयुक्त पदाधिकार्यांशी समन्वय न ठेवता एकतर्फी कारभार करीत असल्याची तक्रार मध्यंतरी महापौर उज्ज्वला देशमुख, सभापती विजय अग्रवाल यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी परिपत्रकाच्या मुद्यावर खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्त लहाने यांना दिले आहेत. यासंदर्भातील पत्र प्रशासनाला प्राप्त झाले आहे.