जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या सवलती लागू ! ५१ महसूल मंडळांचा समावेश
By संतोष येलकर | Published: November 29, 2023 06:14 PM2023-11-29T18:14:02+5:302023-11-29T18:14:21+5:30
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय महसूल व वनविभागामार्फत गेल्या १० नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला.
अकोला : शासन निर्णयानुसार दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ५२ पैकी ५१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या सवलती लागू होत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मंगळवारी जारी केला.
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय महसूल व वनविभागामार्फत गेल्या १० नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महसूल मंडळांमध्ये अकोला जिल्ह्यातील ५२ पैकी ५१ महसूल मंडळांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ५१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या विविध आठ सवलती लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी जिल्ह्यातील संबंधित विभागांना दिला.
लागू केलेल्या अशा आहेत सवलती !
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादी सवलती जिल्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत.
दुष्काळसदृश परिस्थिती घोषित, असे आहेत महसूल मंडळ !
अकोला तालुका : अकोला, घुसर, दहीहांडा, कापशी, उगवा, आगर, बोरगावमंजू, पळसो बु., सांगळूद, कुरणखेड व शिवणी.
अकोट तालुका : अकोट, मुंडगाव, पणज, चोहोट्टा, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा व अकोलखेड.
तेल्हारा तालुका : तेल्हारा, हिवरखेड, अडगाव बु., पाथर्डी, पंचगव्हाण, माळेगाव बाजार.
बाळापूर तालुका : बाळापूर, पारस, वहाळा, वाडेगाव, उरळ बु., निंबा, हातरुण.
बार्शिटाकळी तालुका : बार्शिटाकळी, राजंदा, धाबा, पिंजर, खेर्डा बु., महान.
पातूर तालुका : पातूर, बाभूळगाव, आलेगाव, चान्नी, सस्ती.
मूर्तिजापूर तालुका : मूर्तिजापूर, हातगाव, निंबा, माना, शेलूबाजार, लाखपुरी, कुरुम, जामठी.