कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:20 PM2018-08-28T12:20:51+5:302018-08-28T12:23:29+5:30

पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

discrimination in agriculture pump electricity supply west vidarbha | कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव

कृषी पंप वीज पुरवठ्यातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव

Next
ठळक मुद्दे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याची योजना लागू केली.पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना लागू करण्यात आली नाही. अजूनही चार दिवस दिवसा उजेडी आणि तीन दिवस रात्री, असा आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.

अकोला : सिंचन, उद्योग, शिक्षण, रस्ते, वीज अशा सर्वच आघाड्यांवर पश्चिम विदर्भ बराच मागास असतानाही शासनाकडून पूर्व विदर्भाच्या पारड्यात भरभरून दान टाकल्या जात आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत कृषी पंपांसाठी १२ तास वीज पुरवठा केला जात असताना, पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत मात्र केवळ आठ तास वीज मिळत असल्याने या क्षेत्रातही पश्चिम विदर्भासोबत दुजाभाव होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
पूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत इतर विभागांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याची ओरड होती. तोच प्रकार आता विदर्भात होत आहे. पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भाला झुकते माप दिले जात असल्याची भावना या भागातील लोकांमध्ये आहे. मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरिपातील पीक संकटात सापडले होते. या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने जास्त सिंचन क्षेत्र असलेल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा करण्याचे आदेश दिले. आदेशाची अंमलबजावणी करताना महावितरणने तातडीने पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याची योजना लागू केली. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मात्र ही योजना लागू करण्यात आली नाही. या जिल्ह्यांमध्ये जवळपास पाच लाखांवर कृषी पंप आहेत. या पंपांना अजूनही चार दिवस दिवसा उजेडी आणि तीन दिवस रात्री, असा आठ तास वीज पुरवठा केला जात आहे.

आॅक्टोबरमध्ये वाढणार मागणी
सप्टेंबर अखेरीस मॉन्सून काढता पाय घेतो. याच वेळी रब्बी पिकांची लागवड केली जाते. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यास शेतकºयांची भिस्त सिंचनावरच असते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात कृषी पंपांना जास्त वेळ वीज पुरवठा मिळणे गरजेचे असते. या कालावधीत तरी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

 

Web Title: discrimination in agriculture pump electricity supply west vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.