राष्ट्रवादीत प्रवेशासाठी भदे, सिरस्कार यांची चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 01:14 PM2020-03-09T13:14:23+5:302020-03-09T13:14:33+5:30
इच्छुक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेऊ, असे भदे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वंचित बहुजन आघाडीचा ४५ पदाधिकाऱ्यांसह सामूहिक राजीनामा दिल्यानंतर माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पक्ष प्रवेशाबाबत रविवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात चर्चा केली. चर्चेत उपस्थित केलेल्या विविध मागण्यांबाबत केंद्र व राज्य स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सोबत या, त्यानंतर प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न करू, असे आश्वासन पक्षाचे नेते पवार यांनी दिले. त्यावर सोबत येणाºया इच्छुक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील आठवड्यात निर्णय घेऊ, असे भदे यांनी सांगितले.
भारिप-बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांत असलेल्या पदांचा सामूहिक राजीनामा देत असल्याचे पत्र माजी आमदारद्वय हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह ४५ पदाधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारी रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिले होते. त्यानंतर पुढील राजकीय कारकिर्दीसाठी इतर पक्षासोबत चर्चाही सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोल्यातील नेते रामेश्वर पवळ यांच्या माध्यमातून पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी बोलणी झाली. त्यावेळी ८ मार्च रोजी सविस्तर बैठक ठरविण्यात आली. त्यानुसार रविवारी माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार, नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर, प्रा. सदानंद माळी, दिनकर नागे यांच्यासह २०० पदाधिकाºयांनी बैठकीला हजेरी लावली. बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह रामेश्वर पवळ उपस्थित होते. पक्ष प्रवेशाबाबत उपस्थितांनी भूमिका मांडली. त्यावर विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करा, अशा सूचना पवार यांनी पाटील व भुजबळ यांना केल्या.