मुद्दे पे चर्चा: अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल झालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 03:55 PM2019-04-16T15:55:24+5:302019-04-16T15:58:52+5:30
क्रीडा प्रबोधिनीदेखील दिमाखाने उभी आहे; मात्र मागील १५ वर्षांपासून अकोला जिल्ह्यात राजकीय उदासीनतेमुळे क्रीडा क्षेत्राची अधोगती सुरू झाली आहे.
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: सर्वाधिक क्रीडा मंत्री देणारा जिल्हा अशी ओळख अकोल्याला प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र शासनाचा जिल्हा क्रीडा संकुल हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अकोला जिल्ह्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात साकारला गेला. राज्यातील एकमेव अकोला जिल्ह्यात दोन जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले आहेत. क्रीडा प्रबोधिनीदेखील दिमाखाने उभी आहे; मात्र मागील १५ वर्षांपासून अकोला जिल्ह्यात राजकीय उदासीनतेमुळे क्रीडा क्षेत्राची अधोगती सुरू झाली आहे.
अकोला शहरात वसंत देसाई क्रीडांगण व लालबहादूर शास्त्री क्रीडांगण हे दोन क्रीडा संकुल शासनाने उभारले आहेत. या क्रीडांगणात प्राथमिक सुविधादेखील अपुऱ्या आहेत. हॉकीचे मैदान केवळ कागदपत्रावरच आखलेले आहे. युती सरकारने सत्तेवर येताच मोठा गाजावाजा करीत हॉकी मैदानाचे उद्घाटन केले होते; मात्र आज मैदान कुठेच दिसत नाही, ही वास्तविकता आहे. जिल्ह्यात १५ वर्षांपासून खासदार युती सरकारचेच आहेत; परंतु क्रीडाक्षेत्राकडे कायम दुर्लक्षित धोरण अंगीकारल्यामुळे येथे क्रीडा विकास होऊ शकला नाही. आज देशामध्ये आणि राज्यात क्रीडा क्षेत्रात अकोलाची जी ओळख आहे ती खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांनी स्वबळावर मिळविलेली आहे.
तालुका क्रीडांगणाची अवस्था
अकोला तालुका क्रीडांगण अद्यापही जागेच्या प्रतीक्षेतच आहे. बाळापूर तालुका क्रीडांगणासाठी महत्प्रयासाने अलीकडेच जागा मिळाली. निधीदेखील प्राप्त झाला; मात्र बांधकामाचे भिजत घोंगडे पडले आहे. अकोट तालुका क्रीडांगणाची कार्यालयीन इमारत अद्यापही उभारल्या गेली नाही. तेल्हारा तालुका क्रीडांगणातील अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत आणि विविध खेळाची मैदाने अजूनही तयार केलेली नाही. बार्शीटाकळी तालुका क्रीडांगणामध्ये तर इनडोअर हॉल, व्यायामशाळा, प्रसाधनगृह, संरक्षित भिंत, पाण्याची सुविधा, विद्युतीकरण अशी कितीतरी कामे बाकी आहेत. मूर्तिजापूर तालुका क्रीडांगणातील प्राथमिक कामे पूर्ण झाली आहेत; परंतु आधुनिक खेळ सुविधा उपलब्ध नाहीत. पातूर तालुका क्रीडांगणाचेदेखील इनडोअर हॉल, व्यायामशाळा आदी कामे बाकी आहेत.
तालुका क्रीडा अधिकारी पद रिक्त
मूर्तिजापूर आणि पातूर तालुका सोडून उर्वरित तालुक्यात तालुका क्रीडा अधिकारीपद रिक्तच आहेत. क्रीडा अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त भार सोपविला गेला आहे.
खेळ आॅक्सिजनवर
एकेकाळी हॉकी, फुटबॉल, खो-खो, कुस्ती, कबड्डी खेळाला अकोल्यात वैभवाचे दिवस होते. राजकीय इच्छाशक्ती असलेले नेते अकोल्यात नसल्याने फुटबॉल आॅक्सिजनवर आहे. तर खो-खो खेळालाच जिल्ह्यातून खो मिळत आहे. हॉकीला मैदान नसल्याने नवे खेळाडू तयार होत नाही.
जिम्नॅस्टिक गायब
अकोला जिल्ह्यात बºयापैकी जिम्नॅस्टिक खेळाचे खेळाडू तयार झाले होते; मात्र प्रशिक्षकानेच चिमुकल्या खेळाडूवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने जिम्नॅस्टिक खेळाकडे खेळाडूंनी पाठ फिरविली. क्रीडा संकुलातील बहूद्देशीय हॉलमध्ये जिम्नॅस्टिककरिता जागा देण्यात आली होती; मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून जिम्नॅस्टिक खेळ अप्रिय घटनेमुळे जिल्ह्यातूनच गायब झाला आहे.
तीन घटना उघडकीस
प्रशिक्षकाकडून खेळाडूंवर अनैसर्गिक अत्याचाराच्या तीन घटना मागील तीन वर्षात अकोला जिल्ह्यात उघडकीस आल्याने क्रीडा क्षेत्राला काळिमा फासली गेली; मात्र लागोपाठ तीन घटना घडूनदेखील लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. साधी खेळाडूंची चौकशीदेखील केली नाही. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुका क्रीडा संकुलाकरिता निधी प्राप्त झाला असून, आचारसंहितेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उर्वरित कामांना सुरुवात होणार आहे.
- श्याम देशपांडे
क्रीडा अधिकारी
राजकारणात खेळ हवा; पण खेळात राजकारण नको. अकोला क्रीडा क्षेत्राला लागलेली राजकीय वाळवी संपुष्टात आली, तर त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितपणे दिसतील.
- प्रभाकर रू माले
आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारप्राप्त