कपाशीवर येतोय मर रोग; शेतकऱ्यांची चिंता वाढली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:58 PM2018-08-28T17:58:09+5:302018-08-28T17:58:46+5:30
अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
अकोला : विदर्भ, मराठवाड्यातील कापूस पट्ट्यात आता मर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली असून, या दोन भागातील कपाशी पिकावर अल्प प्रमाणात हा रोग आढळून आल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.
पश्चिम विदर्भातील कपाशी प्रमुख पीक असून, मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही भागात खरीप पीक म्हणून कपाशी लागवड करण्यात येते; परंतु खान्देश, मराठवाडा तसेच विदर्भातील अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील सिंचनाची सोय आहे. तेथे पूर्वमान्सून कपाशीची लागवड मे महिन्यात करण्यात येते. यावर्षी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शासनाने २० मे पासून बीटी बियाणे विक्री सुरू केली असली, तरी बहुतांश ठिकाणी याअगोदर बीटी कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. कपाशीच्या बीटी वाणाची लागवड ही साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या २ ते ३ इंच पाऊस झालेला असेल, अशा वेळेस करावी लागते; पण ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्था होती, त्यांनी बीटी कपाशीची मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर पिकांच्या जोमदार वाढीसाठी रासायनिक खत, कीटकनाशके आणि वाढ नियंत्रकाचा अतिवापर करण्यात येत असल्याने या परिस्थितीत मे महिन्यात वाढलेले तापमान तसेच पिकाला ठिबक किंवा इतर माध्यमाने करण्यात आलेले ओलीत यामुळे जमिनीतील तापमानात होणारा सतत बदल व दिवसाच्या शुष्क वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी तसेच सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात जर पावसाचा खंड पडला आणि लगेच पाऊस आल्यास कपाशीवर विपरीत परिणाम होऊन ते आकस्मिक मर रोगाला बळी पडते; पण यावर्षी आताच मर रोगाच्या प्रादुर्भावाचे लक्षण कपाशीवर दिसत असून, कपाशी पीक निस्तेज दिसत असल्याच्या तक्रारी शेतकºयांमधून होत आहे.