अकाेला महापालिकेच्या आयुक्तपदासाठी आयएएस अधिकाऱ्यांची नापसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 11:18 AM2021-07-15T11:18:18+5:302021-07-15T11:21:12+5:30
Akola Municipal Commissioner : पापळकर रुजू हाेण्याची शक्यता कमी असल्याने मनपा आयुक्तपदासाठी नव्याने आदेश निघण्याचे संकेत आहेत.
अकाेला : अकाेला महापालिकेच्या आयुक्त निमा आराेरा यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी विद्यमान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची बदली करण्यात आली आहे, मात्र पापळकर हे रुजू हाेण्याचे संकेत नाहीत. येथे दुसऱ्या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचा शाेध प्रशासनाकडून घेतला जात असून आयएएस अधिकाऱ्यांची अकाेल्याच्या मनपा आयुक्तपदासाठी नापसंतीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मंगळवारी रात्री जिल्हाधिकारी पापळकर यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच सामाजिक व राजकीय वर्तुळातही या फेरबदलाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकारी पद भूषविल्यावर त्याच जिल्ह्यात दुय्यमपदी काम करणे हे प्रशासकीय शिष्टाचाराला धरून नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान, बदलीची माहिती मिळताच पापळकर यांनी मुंबई गाठली आहे. ते महापालिका आयुक्तपदी रुजू हाेण्याची शक्यता कमी असल्याने मनपा आयुक्तपदासाठी नव्याने आदेश निघण्याचे संकेत आहेत.
अराेरा घेणार पदभार
नवनियुक्त जिल्हाधिकारी निमा अराेरा या गुरुवारी किंवा शुक्रवारी पदभार घेण्याची शक्यता आहे. मावळते जिल्हाधिकारी हे मुंबई येथे गेले असल्याने त्यांच्या परतीनंतरच त्या पदभार स्वीकारतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयुक्तपदासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी
अकाेला महापालिका आयुक्तपदासाठी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचा शाेध प्रशासनाने सुरू केला असला तरी आयुक्तपदासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीच नियुक्ती हाेण्याची चिन्हे आहेत. अकाेला मनपामध्ये डाॅ. विपीन कुमार शर्मा यांच्यानंतर निमा अराेरा या दाेनच आएएएस दर्जाच्या आयुक्तांनी पदभार सांभाळला आहे हे विशेष.