कर्तव्याबाबत उदासीनता : मुख्याध्यापक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:05 PM2019-01-29T14:05:46+5:302019-01-29T14:06:10+5:30
अकोला : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अडगाव बुद्रूक येथील मुख्याध्यापक शंकर भारसाकळे यांना निलंबित केल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी दिला आहे.
अकोला : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अडगाव बुद्रूक येथील मुख्याध्यापक शंकर भारसाकळे यांना निलंबित केल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी दिला आहे. विभागीय आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर त्यांनी तत्काळ कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार भारसाकळे यांच्यावर वर्षभरानंतर कारवाई झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळेवर कार्यरत असलेले मुख्याध्यापक शंकर भारसाकळे यांची वर्तणूक आक्षेपार्ह असल्याचा गंभीर मुद्दा तक्रारीत मांडण्यात आल्या. त्यावर फेब्रुवारी २०१८ मध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठांकडून चौकशी करण्यात आली. त्यामध्ये मुख्याध्यापक भारसाकळे यांची वर्तणूक चांगली नसणे, शाळेतील अस्वच्छता, कर्तव्याबाबत असलेली उदासीनता, कामातील हलगर्जीपणा, सहकाऱ्यांसोबत त्यांचे वर्तन, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, या बाबी स्पष्ट झाल्या. त्यामुळे मुख्याध्यापक भारसाकळे यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ठेवण्यात आले आहे.